राजकीय पक्षांत अंतर्गत मतप्रदर्शन आवश्‍यक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

राजकीय पक्षांत अंतर्गत मतप्रदर्शन आवश्‍यक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : राष्ट्रीय प्रसारमाध्यमांबरोबर गेली तीन वर्षे फटकून वागणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील पत्रकारांबरोबर दिवाळीनिमित्त सेल्फी काढण्याचा जंगी प्रयोग केला. राजकीय पक्षांत वरपासून खालपर्यंत वैचारिक एकसूत्रता हरवली असून, हा माध्यमांनी व्यापक चर्चेचा विषय बनवावा, अशी अपेक्षा त्यानी व्यक्त केली. 

भाजप मुख्यालयात आज दुपारी मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दिवाळीनिमित्त झालेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली. शहा यांनी पत्रकारांबरोबर भेटीगाठीचा कार्यक्रम केला. मोदी यांनी मंडपात सर्वत्र फिरून त्यांच्याबरोबर मनमुराद सेल्फी काढण्याची पत्रकारांची हौस भागविली.

दरम्यान, मोदी व शहा या जोडगोळीच्या वागण्यातील बदलाने भाजपचे वृत्तांकन वर्षानुवर्षे करणारे अनेक राष्ट्रीय व प्रादेशिक पत्रकार आचंबित झाले होते. आगामी गुजरात निवडणुकीतील जनमताचा कल दिसू लागताच भाजपचे सर्वेसर्वा बनलेल्या मोदी यांच्या वागणुकीतील हा बदल लक्षणीय मानला गेला.

मोदी व शहा यांच्याशिवाय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, संघटनमंत्री रामलाल, माहिती प्रसारणमंत्री स्मृती इराणी, अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी आदी हजर होते. मात्र एरवी पत्रकारांसमोर व माध्यमांत राहण्याची हौस असलेल्या अनेक भाजप मंत्र्यांना येथे गर्दी न करण्यास सांगण्यात आल्याचे समजते. मोदी म्हणाले, की देशात राजकीय पक्षांतील अंतर्गत लोकशाही व त्यांचे संघटनात्मक कामकाज, त्यातील कमतरता व उणीवा यांची सामान्य जनतेला जवळून माहिती नाही. माध्यमांनी ती माहिती जनतेपर्यंत पोचविली पाहिजे. 

मोदी यांनी देशाच्या लोकशाहीच्या भवितव्यासाठी राजकीय पक्षांत अंतर्गत लोकशाही व खुले मतप्रदर्शन वाढणे अत्यावश्‍यक आहे असे सांगितले. स्वच्छ भारत योजनेतील प्रसार माध्यमांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल त्यांनी मोकळेपणाने कौतुकोद्‌गार काढले. 

जुन्या आठवणी 
पूर्वी म्हणजे 80 च्या दशकात आपण संघटनात्मक काम करताना याच 9 अशोका रस्त्यावर राहायचो, अशी आठवण सांगून मोदी म्हणाले, की तेव्हा आपल्याला भेटणारे काही पत्रकार अजूनही तेवढ्याच आत्मीयतेने भेटतात. त्या वेळी मी येथेच एका छोट्या खोलीत राहत असे. पत्रकार रात्री, दिवसा कधीही दार ठोटावून थेट आत येत व गप्पांची मैफल जमायची, अशी आठवण त्यांनी सांगितली. आता मलाच सुरक्षा व इतर कारणांमुळे लोकांमध्ये मनासारखे मिसळता येत नाही, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com