काँग्रेसमध्ये 'राहुलराज'; शनिवारी सूत्रे स्वीकारणार 

काँग्रेसमध्ये 'राहुलराज'; शनिवारी सूत्रे स्वीकारणार 

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये दोन दशकांपासून सुरू असलेले सोनिया युग समाप्त झाले असून, आजपासून राहुल युग सुरू झाले. राहुल गांधी हे काँग्रेसच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्याची औपचारिक घोषणा आज झाली.

अध्यक्षपदासाठी केवळ राहुल गांधी यांचा एकमेव अर्ज आला होता. काँग्रेस मुख्यालयात येत्या शनिवारी (ता. 16) होणाऱ्या सोहळ्यामध्ये राहुल गांधी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. 

पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी काँग्रेस मुख्यालयामध्ये झालेल्या भरगच्च पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांच्या निवडीची घोषणा केली. चार डिसेंबरला राहुल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना पाठिंबा देण्यासाठी पक्षाचे कार्यकारिणी सदस्य, सरचिटणीस, प्रदेशाध्यक्ष आदींनी 89 अनुमोदक संचही दाखल केले होते. पाच डिसेंबरला झालेल्या अर्ज छाननीतूनच अनौपचारिकरीत्या राहुल यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाले होते; परंतु निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता स्पष्ट करण्यासाठी अर्ज माघारीनंतरच राहुल गांधींच्या निवडीची घोषणा होईल, असे काँग्रेसतर्फे सांगण्यात येत होते. 

त्या पार्श्‍वभूमीवर रामचंद्रन यांनी निवडणूक प्राधिकरणातील अन्य सहकारी मधुसूदन मिस्त्री आणि भुवनेश्‍वर कालिता यांच्या उपस्थितीत राहुल गांधींनी अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. मात्र, गुजरातच्या निवडणूक प्रचारात व्यग्र असलेले राहुल गांधी 16 डिसेंबरला (शनिवार) अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. त्याच दिवशी सकाळी 11 च्या सुमारास त्यांना विजयाचे प्रमाणपत्र सोपविण्यात येईल, असेही रामचंद्रन यांनी स्पष्ट केले. काँग्रेसमध्ये 'राहुलराज'च्या प्रारंभाचे मुख्यालयाबाहेर जमलेल्या नेते कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. जोरदार घोषणाबाजीद्वारे, ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्‍यांच्या आतषबाजीत या कार्यकर्त्यांनी राहुल यांच्या निवडीचा आनंद व्यक्त केला. 

राहुल गांधी 16 डिसेंबरला औपचारिकरीत्या अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. गुजरात निवडणुकीमधील आक्रमक प्रचारामुळे राहुल गांधींची उंचावलेल्या प्रतिमेचे भांडवल करण्यासाठी हा कार्यक्रम 'जोरदार इव्हेन्ट' म्हणून साजरा करण्याचे काँग्रेसने नियोजन केले आहे. राहुल गांधींचे नेतृत्व सर्वमान्य असल्याचे दर्शविण्यासाठी इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांमार्फत प्रतिमा संवर्धनाचा हा प्रयत्न असेल असे सांगितले जात आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्यपातळीवरील प्रमुख नेत्यांना त्यादिवशी मुख्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आल्याचे कळते.

या नेतेमंडळींना राहुल गांधी मेजवानी देणार असून, आगामी वाटचालीबद्दल त्यांच्याशी चर्चाही करणार असल्याचे समजते. 

2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधींना पंतप्रधान पदाचे सर्वमान्य उमेदवार म्हणून ठसविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असला तरी मोदींविरोधात समविचारी विरोधी पक्षांची बळकट आघाडी असावी, असाही विचार काँग्रेसमधून मांडला जात आहे. सर्वांत नजीकच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचप्रमाणे राजस्थान आणि मध्य प्रदेशात काँग्रेसला अन्य पक्षांशी आघाडीची फारशी आवश्‍यकता नाही.

छत्तीसगडमध्येही यंदा चांगली संधी असल्याचे काँग्रेसचे मानणे आहे. मात्र, काँग्रेसमधूनच बाहेर पडलेल्या अजित जोगींकडून या संधीला आयत्यावेळी सुरुंग लावला जाऊ नये, यासाठी राहुल गांधींची रणनीती काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे असेल. तमिळनाडूत द्रमुक, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष, बिहारमध्ये लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाशी काँग्रेसची आघाडी आहेच. मात्र, संसदेत सर्वाधिक खासदार पाठविणाऱ्या उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षासोबत मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला एकत्र आणण्याचे आव्हान काँग्रेसपुढे आहे. आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेस, तेलंगणात 'टीआरएस', जम्मू-काश्‍मीरमध्ये उमर अब्दुल्लांचा नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांवरही आघाडीसाठी काँग्रेसची नजर आहे. 

अध्यक्षपदानंतर पुढे काय? 
अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधींना सर्वप्रथम 'आपला संघ' म्हणजे नवी कार्यकारिणी, प्रदेशाध्यक्ष निवडीचे आव्हान असेल. 

यामध्ये जुन्या नेत्यांचा आदर राखणे आणि नव्या नेत्यांना संधी देणे, अशी दुहेरी जबाबदारी राहुल यांना पार पाडावी लागणार आहे. विशेष म्हणजे, राजीव गांधी, सोनिया गांधींच्या काळापासून चालत आलेले 'राजकीय सचिवपदी' राहुल गांधींच्या काळात कोण असेल, याची चर्चा रंगली आहे. आतापर्यंत अध्यक्षांबरोबरच राजकीय सचिव हेही काँग्रेसमधील दुसरे सत्ताकेंद्र राहिले आहे. साहजिकच, मावळत्या अध्यक्षा सोनिया गांधींचे राजकीय सचिव अहमद पटेल हेच या पदावर राहतील की राहुल गांधी तेथे आपली विश्‍वासू व्यक्ती आणतील, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

अल्पावधीत राहुल यांच्या वर्तुळात खास जागा निर्माण करणारे अजय माकन यांची या पदासाठी चर्चा सुरू आहे. याखेरीज मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये नवे प्रदेशाध्यक्ष नेमले जाणे अपेक्षित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com