'डेरा सच्चा सौदा'च्या प्रमुखांबाबत आज निकाल; सिरसामध्ये तणाव

पीटीआय
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

चंडीगड : लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी आणि 'डेरा सच्चा सौदा'चे प्रमुख गुरमीत रामरहीम सिंग यांच्याशी संबंधित खटल्याची आज सुनावणी होणार असल्याने पंचकुला आणि सिरसा परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरमित यांचे पंजाब आणि हरियानातील हजारो अनुयायी या भागात गोळा झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. स्थानिक प्रशासनाने अप्रिय घटना टाळण्यासाठी अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू केली असून, इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. आज अतिसंवेदनशील भागामध्ये लष्करासही पाचारण करण्यात आले. 

गुरमीत रामरहीम सिंग न्यायालयामध्ये दाखल झाले आहेत. न्यायालयात येताना सिंग यांच्याबरोबर दोनशे गाड्यांचा ताफा असल्याचे वृत्तवाहिन्यांवरील वृत्तात नमूद केले होते.

हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काल केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि संरक्षणमंत्री अरुण जेटली यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करत तेथील परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. पंचकुला आणि सिरसा भागामध्ये लष्कर तैनात केले जावे, अशी विनंती त्यांनी केंद्राकडे केली आहे. गुरमित रामरहीम सिंग यांना समर्थन देण्यासाठी त्यांचे हजारो अनुयायी डेराचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिरसा आणि पंचकुलामध्ये दाखल झाले आहेत. 
 
उच्च न्यायालयाने झापले 
पंचकुलामध्ये 'डेरा सच्चा सौदा'चे हजारो अनुयायी एकवटल्यानंतर पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले. जमाव बंदीचा आदेश लागू असताना तुम्ही लोकांना एकत्र कसे काय जमू देता, असा सवाल न्यायालयाने सरकारला विचारला आहे. केंद्राने तातडीने राज्य सरकारला अतिरिक्त मदत पुरवावी, असे न्यायालयाने आपल्या आदेशांत म्हटले आहे. सिरसा शहर आणि लगतच्या तीन गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

निमलष्करी दलाचे जवान तैनात 
पंजाब आणि हरियानामध्ये 'डेरा सच्चा सौदा'चे हजारो अनुयायी आहेत, न्यायालयाचा निकाल विरोधात गेला तर ही मंडळी हिंसक होऊ शकतात, ही बाब शक्‍यता लक्षात घेऊन राज्यामध्ये पंधरा हजार निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. सध्या किर्गिझिस्तानमध्ये असलेल्या राजनाथसिंह यांनी तेथून खट्टर यांच्याशी संवाद साधत त्यांना मदतीचे आश्‍वासन दिले.