दयानंद नार्वेकरांची याचिका खंडपीठाने फेटाळली 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

पणजी (गोवा) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गोवा क्रिकेट असोसिएशनला (जीसीए) टीव्ही संच खरेदीस दिलेल्या एक कोटींच्या धनादेशाच्या घोटाळाप्रकरणी नोंद करण्यात आलेली तक्रार रद्द करण्यासाठी दयानंद नार्वेकर यांनी सादर केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज फेटाळली. 

2006-2007 या आर्थिक वर्षासाठी टीव्ही संच खरेदीसाठी बीसीसीआयने एक कोटी रुपयांचे अनुदान धनादेशाच्या स्वरूपात जीसीएला दिला होता. हा धनादेश "जीसीए'च्या अधिकृत बॅंक खात्यामध्ये जमा न करता तत्कालीन मंडळाने जीसीएच्या नावाने बॅंकेत खाते उघडून ही रक्कम काढण्यात आली होती. याप्रकरणी नीलेश प्रभुदेसाई यांनी तक्रार दाखल केल्यानंतर जीसीएचे तत्कालीन पदाधिकारी दयानंद नार्वेकर, चेतन देसाई, बाळू
 फडके व अकबर मुल्ला या चौघांविरुद्ध फसवणूक व कटकारस्थान तसेच पदाचा दुरुपयोग केल्याने दुसरा गुन्हा नोंद केला होता. 

जीसीए घोटाळाप्रकरणी आर्थिक गुन्हा कक्षाने पहिला गुन्हा दाखल केला आहे व दुसरा गुन्हा त्या प्रकरणाचाच भाग असल्याने नव्याने दुसरा गुन्हा दाखल करण्याची गरज नाही. त्यामुळे 20 डिसेंबर 2016 रोजी पोलिसांनी नोंद केलेली दुसरी तक्रार (क्र. 142/2016) रद्द करण्याचे निर्देश पोलिसांना द्यावेत, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.