गुजरातमध्ये विजयाचे दावे-प्रतिदावे सुरू; पहिल्या टप्प्यात 68 टक्के मतदान

गुजरातमध्ये विजयाचे दावे-प्रतिदावे सुरू; पहिल्या टप्प्यात 68 टक्के मतदान

अहमदाबाद : पंतप्रधानांपासून दिग्गज नेत्यांच्या आरोप- प्रत्यारोपांच्या फैरींमुळे देशभर चर्चेचा विषय ठरलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 89 जागांसाठी आज मतदान झाले. काही ठिकाणांवरील इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांमधील (इव्हीएम) बिघाड वगळता ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. 68 टक्के एवढ्या मतदानाची नोंद झाल्याने सर्वपक्षीय नेत्यांची धाकधूक वाढली असून प्रत्येकाने आपलाच पक्ष विजयी होईल असा दावा केला आहे. 

दरम्यान, पटेलांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील तरूण मोठ्या उत्साहाने मतदान करताना दिसून आला. याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो असा दावा राजकीय विश्‍लेषकांनी केला आहे. 

आजचा मतदानाचा दिवस खऱ्या अर्थाने गाजविला तो इलेक्‍ट्रॉनिक मतदान (ईव्हीएम) यंत्रांनी. आज सकाळी मतदानाला सुरवात झाल्यानंतर सुरत, राजकोट, राजपिप्पाला, भावनगर, पालिताना आणि पोरबंदरमधील अनेक मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रेच बंद पडल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. पुढे ही यंत्रे तातडीने बदलण्यात आल्यानंतर मतदानास वेग आला. 

पोरबंदर येथील ठक्कर प्लॉट मतदान केंद्रावर 'ईव्हीएम'लाच ब्लूटूथ जोडण्यात आल्याची तक्रार आल्यानंतर निवडणूक आयोगाचे एक पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले होते. काँग्रेसचे नेते अर्जुन मोधवाडिया यांनी यासंबंधीची तक्रार केली होती; पण आयोगाने ती फेटाळून लावली. आयोगाने सर्व जिल्हा कार्यालयांना तक्रारींची गांभीर्याने दखल घेण्याचे आदेश दिले होते. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, काँग्रेस नेते शक्तिसिंग गोहिल आणि परेश धनानी आदी दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत कैद झाले आहे. 

उच्चांकी मतदान 
तापी जिल्हा... 38.07 टक्के 

नीचांकी मतदान 
नर्मदा जिल्हा... 25.67 टक्के 

सर्वांचाच उत्साह 
सध्या गुजरातमध्ये लग्नसराई सुरू असून भरूच, भावनगर, गोंडल आणि सुरतमध्ये नववधू आणि वरांनी मतदानाचा हक्क बजावला. 

राजकोटमधील 115 वर्षांच्या आजिबेन चंद्रवाडिया या आजीबाईंनीही आज मतदान केले. मुख्यमंत्री विजय रूपानी, त्यांचे राजकोट पश्‍चिममधील विरोधक इंद्रनील राज्यगुरू, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, भाजप प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी आदी मान्यवरांनी सकाळीच मतदान केले, तर क्रिकेटपटू चेतेश्‍वर पुजाराने राजकोटमध्ये मतदानाचा हक्क बजावला. 

केंद्रातील भाजप सरकार कुचकामी ठरले असून, याच सरकारने मागील 22 वर्षांत राज्यासाठी काहीही केलेले नाही. आज सर्व समाजघटक मतदानाच्या निमित्ताने एकत्र आलेले पाहायला मिळाले. आमचा पक्ष 110 जागांवर विजयी होईल. 
- अहमद पटेल, काँग्रेसचे नेते 

निवडणूक आयोगाने इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या विश्‍वासार्हतेबाबत उपस्थित केल्या जाणाऱ्या सर्व शंकांचे निराकरण करावे. 
- उमर अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री, जम्मू- काश्‍मीर 

या निवडणुकीत भाजपने सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधून दहापेक्षा अधिक जागा जिंकल्यास आपण आरक्षण आंदोलन सोडून देऊ. 
- हार्दिक पटेल, पटेल समाजाचे नेते 

डॉ.मनमोहनसिंग पंतप्रधान असताना सोनिया गांधीच सरकार चालवित होत्या. तेव्हा 'एलईडी' बल्बची किंमत 300 रूपये एवढी होती, माझ्या सरकारच्या काळात हाच बल्ब 50 रूपयांना मिळतो. सामान्य माणसाचे आम्ही एका बल्बवरील तीनशे रूपये वाचविले आहेत. हीच गोष्ट काँग्रेसला खुपते. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान (मेहसाणा येथील सभेत बोलताना)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com