मोदींकडून घटनात्मक संस्थांची प्रतिष्ठा धुळीस 

मोदींकडून घटनात्मक संस्थांची प्रतिष्ठा धुळीस 

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी केलेल्या काँग्रेस आणि पाकिस्तानच्या कथित षड्‌यंत्राच्या आरोपावरून संतप्त झालेले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ''मोदींच्या वक्तव्यामुळे अतीव वेदना झाल्या. घटनात्मक संस्थांची प्रतिष्ठा धुळीस मिळविण्याचा घातक पायंडा ते पाडत आहेत'', असे खरमरीत प्रत्युत्तर दिले. उथळपणे बोलून राजकीय फायदा मिळविण्याऐवजी गांभीर्य आणि परिपक्वता दाखवून मोदी देशाची माफी मागतील, असे खोचक आवाहनही त्यांनी केले. 

राजकीय आरोप प्रत्यारोपांपासून अंतर राखणारे मितभाषी डॉ. मनमोहनसिंग यांनी आज निवेदन जारी करून पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला. मणिशंकर अय्यर यांनी आयोजित केलेल्या मेजवानीत आपण गुजरात निवडणुकीबाबत कोणाशीही चर्चा केली नाही. एवढेच नव्हे; तर उपस्थितांपैकी कोणीही याबाबत विषयही काढला नाही.

यासंदर्भात मोदींनी केलेल्या आरोपांचा आपण स्पष्ट शब्दांत इन्कार करतो. तेथील चर्चा केवळ भारत-पाकिस्तान संबंधांपुरताच मर्यादित होती. तेथे उपस्थित असलेले मान्यवर, पत्रकार याला दुजोरा देतील. त्यांच्यापैकी कोणावरही राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सहभागाचा आरोप केला जाऊ शकत नाही. सर्वोच्च संस्था असलेले पंतप्रधान पद सांभाळताना पंतप्रधान मोदींनी उथळपणे बोलून राजकीय लाभ मिळविण्यात ऊर्जा खर्च करण्याऐवजी थोडे तरी गांभीर्य आणि परिपक्वता दाखवतील आणि किमान त्या पदाची प्रतिष्ठा जपण्यासाठी ते देशाची माफी मागतील, अशी अपेक्षा आहे, असे डॉ. सिंग म्हणाले. 

पंतप्रधान पदावरील व्यक्तीकडून केवळ राजकीय फायद्यासाठी केल्या जाणाऱ्या असत्य आणि खोडसाळ प्रचाराने वेदना झाल्या आहेत. गुजरातमध्ये दारुण पराभवाच्या भीतीमुळे मोदींनी आता अपशब्द वापरणे सुरू केले आहे. मोदींनी सत्तेच्या लालसेपोटी माजी पंतप्रधान आणि माजी लष्करप्रमुख यांसारख्या घटनात्मक पदांची प्रतिमा उद्‌ध्वस्त करत आहेत. हा घातक पायंडा पाडण्याचा प्रकार दुःखद आहे, असाही टोला सिंग यांनी लगावला. 

भाजपवरही त्यांनी प्रहार केले. ते म्हणाले, राष्ट्रवादाच्या मुद्‌द्‌यावर काँग्रेसला पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या पक्षाकडून प्रवचनाची आवश्‍यकता नाही. दहशतवादाशी लढण्याचा त्यांचा इतिहास सर्वविदीत आहे. उधमपूर तसेच गुरुदासपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही मोदी कोणतेही निमंत्रण नसताना पाकिस्तानला गेले. एवढेच नव्हे, तर सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या हवाईदळाच्या पठाणकोट तळावर पाकिस्ताननेच दहशतवादी हल्ला घडवून आणला असताना, त्याच्या चौकशीसाठी कुख्यात आयएसआयला पायघड्या अंथरल्या. गेल्या पाच दशकात आपण केलेली देशसेवा जगजाहीर आहे. केवळ राजकीय फायद्यासाठी त्यावर पंतप्रधान मोदींसह कोणीही प्रश्‍न उपस्थित करू शकत नाही, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com