'विकास वेडा झालाय' मोहिमेने भाजप धास्तावला 

महेश शहा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

या धारदार टीकेची दखल पक्षाध्यक्ष अमित शहा व राज्याचे प्रभारी अरुण जेटली यांनी गांभीर्याने घेतली आहे. या टीकेची फारशी दखल न घेण्याचा सल्ला त्यांनी पक्षकार्यकर्त्यांना दिला आहे; तर 'विकास वेडा झालाय'ला मुख्यमंत्री विजय रूपानी, प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी या भाजप नेत्यांनी ज्या प्रकारे नको इतके महत्त्व देत प्रतिक्रिया व्यक्त केल्या, त्यावर जेटली यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे.

अहमदाबाद : सोशल मीडियातील 'विकास वेडा झालाय' या उपहासात्मक टीका मोहिमेमुळे गुजरातमधील भाजपचे सरकार; तसेच नेते अक्षरश: धास्तावले आहेत. वेगवेगळ्या आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या मोदी सरकारसह राज्य सरकारवर गुजारातमध्ये सोशल मीडियावर सध्या टीकेची जोरदार राळ उठवली जात आहे. 

पंतप्रधान मोदी विकासाची भाषा करतात, मात्र लोकांचे जीवन फारसे सुसह्य बनलेले नाही. वाढती महागाई व लोकांना दैनंदिन जीवनात होणाऱ्या त्रासाबद्दल या मेसेजेसद्वारे जोरदार टीका केली जात आहे. टीकेचे हे मेसेजेस व्हॉट्‌सऍपवरून एखाद्या वणव्याप्रमाणे वेगाने पसरत आहेत. त्यामुळे भाजपमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यामुळे राज्यातील भाजपचे सरकार, नेतेच नव्हे; तर पक्षाचे हाय कमांडही काळजीत पडले आहे.

येत्या डिसेंबरमध्ये राज्यात होणाऱ्या निवडणुकीत सोशल मीडियातील या नाराजीचा पक्षाला फटका बसण्याची भीती या नेत्यांना वाटू लागली आहे. विरोधी कॉंग्रेस पक्ष याचा फायदा उठवू लागला आहे. 

जपानचे पंतप्रधान शिंजो अबे व पंतप्रधान मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यादरम्यान सोशल मीडियात हे मेसेज वेगाने फिरले. त्यांच्या दौऱ्यावेळी अहमदाबाद महापालिकेने काही ठराविक रस्तेच स्वच्छ केले. दोन्ही नेते जाणार असलेल्या रस्त्यावरीलच खड्डे बुजविण्यात आले. तसेच या वेळी शहरी भागांत केलेल्या झगमगाटावरील कोट्यवधी रुपयांच्या उधळपट्टीला सोशल मीडियाने लक्ष्य केले आहे. 'कोना बापनी दिवाली, विकासना बापनी दिवाली' (कोणाच्या वडिलांची दिवाळी, विकासाच्या वडिलांची दिवाळी) हा गुजराती भाषेतील संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. येत्या निवडणुकीत भाजप पराभूत होणार असून, दिवाळीपूर्वी भाजपने घर साफ केल्याची टीकाही यात होत आहे. 

या धारदार टीकेची दखल पक्षाध्यक्ष अमित शहा व राज्याचे प्रभारी अरुण जेटली यांनी गांभीर्याने घेतली आहे. या टीकेची फारशी दखल न घेण्याचा सल्ला त्यांनी पक्षकार्यकर्त्यांना दिला आहे; तर 'विकास वेडा झालाय'ला मुख्यमंत्री विजय रूपानी, प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी या भाजप नेत्यांनी ज्या प्रकारे नको इतके महत्त्व देत प्रतिक्रिया व्यक्त केल्या, त्यावर जेटली यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. कारण या भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया आता टीकेचा विषय बनला असून, त्याला गरब्याच्या गाण्याची जोड देत ते रिंग टोन बनविण्यात आले आहेत.