गुजरातमध्ये होणार 'व्हीव्हीपॅट'चा वापर 

महेश शहा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

देशातील सर्व निवडणुकांमध्ये इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांबरोबरच 'व्हीव्हीपॅट' यंत्रांचा वापर करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार संपूर्ण राज्यात 'व्हीव्हीपॅट' यंत्रांचा वापर करणारे गुजरात हे पहिले मोठे राज्य ठरणार आहे.

अहमदाबाद : गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदान केंद्रांवर 'व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल' (व्हीव्हीपॅट) यंत्राचा वापर केला जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील प्रत्येक मतदाराला प्रथमच मतदान केल्याची पावती मिळणार आहे. 

'व्हीव्हीपॅट' यंत्रामुळे मतदारांना त्यांचे मत योग्य प्रकारे नोंद झाले आहे अथवा नाही, याची खात्री करता येणार आहे; तसेच शंका आल्यास तक्रारही करता येणार आहे.

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्याची जबाबदारी मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकाऱ्यावर असणार आहे. मतदाराने केलेली तक्रार बनावट असल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी त्या मतदाराविरोधात तक्रारही करू शकतो. नियमानुसार, अशा प्रकारात संबंधित मतदाराला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. 

देशातील सर्व निवडणुकांमध्ये इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांबरोबरच 'व्हीव्हीपॅट' यंत्रांचा वापर करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार संपूर्ण राज्यात 'व्हीव्हीपॅट' यंत्रांचा वापर करणारे गुजरात हे पहिले मोठे राज्य ठरणार आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत गांधीनगर मतदारसंघात या यंत्राचा प्रायोगिक तत्त्वावर वापर झाला होता. आता राज्यातील 182 मतदारसंघांमधील 50,128 मतदान केंद्रांवर या यंत्राचा वापर होणार आहे. हे निवडणूक आयोगासमोरील मोठे आव्हान असेल. यासाठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात असून, राजकीय पक्ष आणि नागरिकांनाही माहिती पुरविण्यासाठी मोहीम राबविली जात असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. 'व्हीव्हीपॅट'चा प्रथमच मोठ्या प्रमाणावर वापर होणार असल्याने मतदानाचा कालावधीही एक ते दीड तासाने वाढविण्याची मागणी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बी. बी. स्वेन यांनी सांगितले. 

निवडणूक दोन टप्प्यांत? 
मुख्य निवडणूक आयुक्त ए, के. ज्योती हे ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात गुजरातमध्ये येऊन निवडणुकीचा आढावा घेण्याची शक्‍यता आहे. ते सर्व तयारीची पाहणी करून सूचना करतील, असे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले; तसेच डिसेंबर महिन्यातील गुजरात विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांत घेण्याचा निर्णयही ते या वेळी घेण्याची शक्‍यता आहे.