राहुलच होणार काँग्रेसचे अध्यक्ष 

राहुलच होणार काँग्रेसचे अध्यक्ष 

नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वीच राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होणार हे आज स्पष्ट झाले. त्यांच्या नेतृत्वाला आव्हान मिळण्याची सुतराम शक्‍यता नाही. त्यामुळे बिनविरोध निवड होण्यात जमा असून, माघारीच्या अंतिम मुदतीनंतर, म्हणजे पाच डिसेंबरलाच त्यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब होईल.

मोतिलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्यानंतर राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष होणारे गांधी- नेहरू घराण्यातील सहावी व्यक्ती असतील. काँग्रेस कार्यकारिणीने आज मंजूर केलेल्या निवडणूक वेळापत्रकानुसार (मतदान झाल्यास) 16 डिसेंबरला राहुल काँग्रेसचे अध्यक्ष होतील. अर्थात, औपचारिक घोषणा 19 डिसेंबरला होणार आहे. 

राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी 'यूथ ब्रिगेड'कडून होणारा आग्रह, वरिष्ठ नेत्यांचीही याबाबतची पूरक वक्तव्ये पाहता याच वर्षात त्यांचा 'राज्याभिषेक' होणार हे स्पष्ट होते. मात्र, गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधीच राहुल गांधींनी अध्यक्ष व्हावे, ही नव्या फळीतील नेत्यांची मागणी अधिक वजनदार ठरली.

गुजरातमध्ये सध्या असलेल्या अनुकूल वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या जागा वाढल्यास त्याचे श्रेय आपसूक नव्या नेतृत्वाच्या खात्यात जमा होईल. परंतु, अपेक्षित निकाल आला नाही, तर पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्याचा मुहूर्त लांबणीवर पडेल हा युक्तिवाद पुढे आल्यानंतर गुजरातमधील निवडणुकीच्या समांतर, किंबहुना तेथील मतदानाच्या आधीच अध्यक्ष निवडीचे सोपस्कार पूर्ण केले जावेत, असे ठरले होते. 

या साऱ्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या 10, जनपथ या निवासस्थानी कार्यकारिणीची बैठक झाली. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खर्गे, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते. काँग्रेस संघटनेच्या निवडणूक प्रक्रियेअंतर्गत केंद्रीय निवडणूक समितीने अध्यक्ष निवडीचे प्रस्तावित वेळापत्रक सोनिया गांधींपुढे सादर केले होते. 35 मिनिटे चाललेल्या या बैठकीत कार्यकारिणीने वेळापत्रक मंजूर केले. यानंतर पत्रकार परिषदेत निवडणूक समितीचे प्रमुख मुल्लापल्ली रामचंद्रन यांनी वेळपत्रकाची घोषणा केली. 

अशी होईल निवडणूक 
वेळापत्रकानुसार एक डिसेंबरला औपचारिक अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत चार डिसेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत असेल. पाच डिसेंबरला छाननी होईल. याच दिवशी दुपारी साडेतीनपर्यंत वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. 11 डिसेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारीची अंतिम मुदत असेल. याच दिवशी दुपारी चारला रिंगणातील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. सोळा डिसेंबरला निवडणूक होईल. मात्र, एकापेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असतील तरच मतदान होईल आणि 19 डिसेंबरला औपचारिकरीत्या निकाल जाहीर केला जाईल. 

पुढे काय होणार? 
राहुल गांधींनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या महाअधिवेशनात या निवडीला अधिमान्यता दिली जाईल. तत्पूर्वी काँग्रेसमधील शक्तिशाली संस्था असलेल्या कार्यकारिणीमधील सदस्य निवडीची प्रक्रिया पार पाडली जाईल. 25 सदस्यांच्या कार्यकारिणीत 13 सदस्यांची अध्यक्षांकडून नियुक्ती होते आणि उर्वरित पदांसाठी निवडणूक घेण्याची तरतूद आहे. परंतु, निवडणूक घेणे नाममात्रच राहिले आहे. साहजिकच, जुने विरुद्ध नवे नेते या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर पक्षांतर्गत लोकशाही, पारदर्शक निवडणूक प्रक्रिया याचे दाखले देणारे राहुल गांधी कार्यकारिणीसाठी निवडणूक घेतील काय, हे पाहणे औत्सुक्‍याचे आहे. 

सोनिया काय करणार? 
काँग्रेसच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक काळ पक्षाध्यक्षपद सांभाळणाऱ्या सोनिया गांधी या राहुल गांधींच्या निवडीनंतर सक्रिय राजकारणातून जवळपास निवृत्त होणार असल्या, तरी त्यांची नवी भूमिका काय असेल, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्याबाबत आणि उपाध्यक्षपदी कोण यावरही काँग्रेसमधून जाहीरपणे बोलण्यास कोणीही तयार नाही. मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सोनियांच्या नव्या भूमिकेबद्दल '19 तारखेनंतर बोलू' असे सांगितले. परंतु, 'सोनिया गांधी या पक्षाच्या नेत्या आणि मार्गदर्शक असून, त्यांचे सक्षम नेतृत्व नेहमी काँग्रेसजनांसोबत असेल' असेही स्पष्ट केले. काँग्रेसच्या घटनेनुसार माजी अध्यक्ष हे आपोआप पक्षाचे कार्यकारिणी सदस्य बनतात. मात्र, काँग्रेस वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, सोनिया गांधींची राजकीय सक्रियता कमी होणार असली, तरी त्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहतील. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी असतील. त्याचप्रमाणे 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 'यूपीए'ची पुनर्जुळणी करून त्याचेही नेतृत्व सोनिया गांधींकडे सोपविले जाईल. 

नेहरू-गांधी घराण्याचे नेतृत्व... 

नेहरू-गांधी घराण्याकडून 42 वर्षे काँग्रेसचे नेतृत्व 

  • मोतीलाल नेहरू : 2 वर्षे 
  • जवाहरलाल नेहरू : 6 वर्षे 
  • इंदिरा गांधी : 8 वर्षे 
  • राजीव गांधी : 7 वर्षे 
  • सोनिया गांधी : 19 वर्षे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com