'एक देश, एक कर'ऐवजी 'एक देश, सात कर' : काँग्रेस

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 8 ऑक्टोबर 2017

मोदी सरकारमध्ये दूरदृष्टीचा अभाव आणि अहंकाराची बाधा आहे आणि त्यामुळे 'जीएसटी'सारखी सुवर्णसंधी ते वाया घालवत आहेत. 
- रणदीप सुरजेवाला, काँग्रेसचे प्रवक्ते 

नवी दिल्ली : 'जीएसटी'अंतर्गत 'एक देश, एक बाजार, एकच कर' याऐवजी 'एक देश, सात कर' अशी अवस्था मोदी सरकारने केली असून 'चांगला (गुड) व सोपा (सिंपल) कर'ऐवजी 'भीतीदायक कर' लागू केल्याची टीका आज काँग्रेसतर्फे करण्यात आली.

'जीएसटी'सारख्या करसुधारणेच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था आणण्याची एक चांगली संधी मोदी सरकारने गमावल्याची टिप्पणीही पक्षाने केली. सरकारने काल जाहीर केलेल्या उपाययोजना स्वागतार्ह असल्या तरी त्या अपुऱ्या असल्याचे पक्षाने म्हटले आहे. 

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी काल सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या 'जीएसटी' करप्रणालीतील काही सुधारणा व बदलांच्या निर्णयावर आज मतप्रदर्शन केले. सामान्य माणूस आणि शेती किंवा वस्त्रोद्यागासारख्या रोजगारनिर्मितीक्षम क्षेत्रांना दिलासा देण्यात 'जीएसटी' करप्रणालीला अपयश आले आहे. याचे प्रमुख कारण कराच्या दरांची वाढती संख्या आणि किचकट अशी प्रक्रिया हे आहे, असे सांगून सुरजेवाला म्हणाले, की मोदी सरकारमध्ये दूरदृष्टीचा अभाव आणि अहंकाराची बाधा आहे आणि त्यामुळे 'जीएसटी'सारखी सुवर्णसंधी ते वाया घालवत आहेत. 

अर्थव्यवस्थेतील समस्यांमुळे मोदी सरकार गांगरले असून, भेदरटपणातून ते चुकीची पावले उचलत आहेत, असे सांगून सुरजेवाला म्हणाले, की या करप्रणालीद्वारे सामान्य माणसाला दिलासा मिळणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात या करप्रणालीमुळे शेतीचे आणि वस्त्रोद्यागासारखे क्षेत्र संकटात सापडले आहे. ही दोन्ही क्षेत्रे मोठ्या प्रमाणात रोजगार उत्पन्न करणारी म्हणून ओळखली जातात; परंतु या करप्रणालीमुळे या क्षेत्रांची पीछेहाट सुरू झाली आहे. स्वतःच्या अकार्यक्षमतेमुळे या सरकारने अर्थव्यवस्थेला संकटात लोटले आहे आणि आता भेदरून गेलेले हे सरकार आणखी चुका करत सुटले आहे, अशी टीका त्यांनी केली. 

काँग्रेसने 'जीएसटी' विधेयक मांडले होते त्यामध्ये कराचा एकच दर नमूद करण्यात आला होता आणि करप्रणाली ही पारदर्शक आणि सोपी व सुटसुटीत करण्यावर भर देण्यात आला होता; परंतु 'आम्ही सर्वज्ञ आहोत' अशी भूमिका असलेल्या भाजपने या विधेयकाचा विचका करून टाकला. याचा अतिशय विपरित परिणाम अर्थव्यवस्थेवर झाल्याचा आरोपही सुरजेवाला यांनी केला. 

कायदामंत्री व भाजप प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी सरकारतर्फे काल जाहीर करण्यात आलेले 'जीएसटी'मधील बदल व सुधारणा यामुळे लहान व मध्यम उद्योग व्यावसायिकांना लाभ होणार असल्याचे सांगितले. सरकारने लागू केलेल्या 'जीएसटी'सहित विविध करसुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत मोठे बदल झाले आहेत व पारदर्शकतेत वाढ झाल्याचे ते म्हणाले. आता अर्थव्यवस्था ही 'ब्लॅककडून व्हाइट, करचुकवेगिरीकडून करभरणीकडे आणि अनौपचारिककडून औपचारिकतेकडे प्रवास करु लागली आहे,' असे त्यांनी सांगितले. 

'जीएसटी'सहित विविध करसुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत मोठे बदल झाले आहेत व पारदर्शकतेत वाढ झाली आहे. 
- रविशंकर प्रसाद, केंद्रीय कायदामंत्री

Web Title: marathi news marathi websites India GST Narendra Modi Congress