भारत-इस्राईलच्या मैत्री आणि सहकार्याच्या कक्षा रुंदावणार 

भारत-इस्राईलच्या मैत्री आणि सहकार्याच्या कक्षा रुंदावणार 

नवी दिल्ली : कृषी, जलव्यवस्थापन, संरक्षण साधनसामग्री, विज्ञान- तंत्रज्ञान- संशोधन या परंपरागत सहकार्याबरोबरच सायबर सुरक्षा, तेल व नैसर्गिक वायू यांसारख्या नव्या क्षेत्रांतही परस्पर सहकार्याच्या कक्षा रुंदावण्यावर भारत व इस्राईल दरम्यान आज एकमत व्यक्त करण्यात आले. "सरकार ते सरकार' या मैत्री व सहकार्याच्या कक्षा ओलांडून उभय देशांतील संबंध "लोकांच्या पातळीवर' प्रस्थापित होत असल्याबद्दल दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केले. उभय देशांत लवकरच द्विपक्षीय गुंतवणूकविषयक करार करण्याचेही ठरविण्यात आले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यात आज सकाळी प्रथम स्वतंत्रपणे आणि त्यानंतर शिष्टमंडळ पातळीवर चर्चा व वाटाघाटी झाल्या. त्यानंतर दोन्ही नेत्यांतर्फे निवेदन करण्यात आले आणि नऊ करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यानंतर दोन्ही देशांतर्फे संयुक्त निवेदन जारी करण्यात आले. आजच्या बैठकीची माहिती देताना आर्थिक संबंधविषयक सचिव व भावी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी उभय देशांतील मैत्री व सहकार्याचे नवे पर्व सुरू झाल्याचे सांगितले. भारत व इस्राईलदरम्यान, कृषी आणि जलव्यवस्थापन क्षेत्रात आधीपासून सहकार्य सुरू होतेच; परंतु या परंपरागत सहकार्यातील काही अत्याधुनिक व नव्या संशोधनांवर आधारित सहकार्याबाबत या भेटीत चर्चा झाली. विशेषतः पाण्याच्या शुद्धीकरणाच्या क्षेत्राचा यात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर शेतीमध्ये कमी साधनसामग्रीचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याबाबतचे तंत्रज्ञानही देण्याची तयारी इस्राईलने दाखवली आहे. त्याचे तपशील दोन्ही देशांच्या कृषिमंत्र्यांच्या पातळीवर ठरवले जातील. 

परंपरागत सहकार्याच्या क्षेत्रात सायबर सुरक्षा आणि तेल व नैसर्गिक वायूच्या क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. संयुक्त निवेदनात दहशतवादाच्या मुद्द्याचा उल्लेख करतानाच सायबर सुरक्षेबाबत दोन्ही देशांमध्ये करण्यात आलेल्या कराराचे स्वागत करण्यात आले. सायबर सुरक्षेमध्ये माहितीची व विशेषतः गोपनीय माहितीची देवाण-घेवाण करण्याचा समावेश असेल. जागतिक शांतता व सुरक्षेला दहशतवादाचा मोठा धोका असल्याचे संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दहशतवादी गट, दहशतवादी व त्यांच्या संघटना यांना आश्रय देणे, त्यांना आर्थिक व अन्य स्वरूपाची मदत करणे, त्यांना पुरस्कृत करणे, प्रोत्साहन देणे हे कोणत्याही स्वरूपात समर्थनीय नसल्याचे दोन्ही देशांनी म्हटले आहे. उभय देशांत देशांतर्गत सुरक्षा व जनसुरक्षेबाबत स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त कृती गटाची बैठक फेब्रुवारीत होत असून, दहशतवादाच्या मुकाबल्याच्या क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. इस्राईल हा संरक्षण साधनसामग्री पुरवठ्यातील एक प्रमुख देश आहे. शिष्टमंडळ पातळीवर या संदर्भात सर्वसाधारण चर्चा करण्यात आली, असे सचिवांनी सांगितले. स्पाईक मिसाइलची ऑर्डर भारताने रद्द केल्याबाबत चर्चेत काही उल्लेख झाला काय, या प्रश्‍नावर त्यांनी तपशील सांगण्याचे नाकारले. 

या क्षेत्रांमध्ये झाले करार 

  • सायबर सुरक्षा 
  • तेल व नैसर्गिक वायू व ऊर्जा 
  • सहचित्रपट निर्मिती 
  • हवाई वाहतूक 
  • होमिओपथी औषध संशोधन 
  • अंतराळविषयक सहकार्य 
  • भारत व इस्राईलमधील गुंतवणूक 
  • मेटल-एअर बॅटरी 
  • सौर औष्णिक तंत्रज्ञान 

बॉलिवूडलाही देणार निमंत्रण 
नेतान्याहू मुंबईलाही भेट देणार असून, त्या वेळी ते बॉलिवूडला इस्राईलमध्ये निमंत्रण देणार असल्याचे समजते. त्यादृष्टीने दोन्ही देशांतर्फे संयुक्त चित्रपट निर्मितीचा प्रस्तावही करण्यात आला आहे. आजच्या भोजनाच्या वेळी अभिनेते- दिग्दर्शक राज कपूर यांच्या श्री 420 चित्रपटातील "इचक दाना पिचक दाना' हे गाणे बॅंडवर वाजविण्यात आल्यावर नेतान्याहू यांनी हे गाणे इस्राईलमध्ये कमालीचे लोकप्रिय असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com