जेटली, वाद व्यक्तिगत पातळीवर नेऊ नका : यशवंत सिन्हा

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली : 'मी सनदी अधिकाऱ्याची नोकरी बारा वर्षे आधीच सोडून राजकारणात उतरलो आहे. ज्यांनी कधी लोकसभेचे तोंड बघितले नाही, त्यांनी आपल्यावर 80 व्या वर्षी नोकरी मागितल्याचा ठपका ठेवणे हास्यास्पद आहे,' असा पलटवार भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर केला आहे. सिन्हा व जेटली यांच्यातील वाद व्यक्तिगत पातळीवर रंगण्याची चिन्हे आहेत. 

नवी दिल्ली : 'मी सनदी अधिकाऱ्याची नोकरी बारा वर्षे आधीच सोडून राजकारणात उतरलो आहे. ज्यांनी कधी लोकसभेचे तोंड बघितले नाही, त्यांनी आपल्यावर 80 व्या वर्षी नोकरी मागितल्याचा ठपका ठेवणे हास्यास्पद आहे,' असा पलटवार भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर केला आहे. सिन्हा व जेटली यांच्यातील वाद व्यक्तिगत पातळीवर रंगण्याची चिन्हे आहेत. 

यशवंत सिन्हा यांनी अर्थव्यस्थेवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन दिवस मौनात गेलेल्या जेटली यांनी काल सिन्हांवर आडून टीका केली होती. त्यामुळे भडकलेल्या यशवंत सिन्हा यांनी, मी मांडलेल्या मुद्द्यांना ते व्यक्तिगत पातळीवर नेत आहेत असा वार केला.

ते म्हणाले, की हे सज्जन (जेटली) गेली तीस वर्षे एकही लोकसभा निवडणूक जिंकू शकलेले नाहीत, त्यांनी माझी पार्श्‍वभूमी पाहावी. सनदी अधिकाऱ्याची बारा वर्षांची नोकरी बाकी असताना मी सारा मान सोडून राजकारणात आलो होतो. व्ही. पी. सिंह यांनी मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला, तो धुडकावून मी लोकसभा निवडणुकीत उतरलो होतो. राजकारणात आल्यावर पंधरवड्यात मी लोकसभा निवडणूक लढविली व जिंकली. जेटली तीस वर्षे झाली तरी एखादी लोकसभा जागा जिंकण्याच्या प्रतीक्षेतच आहेत. 

नोटाबंदीला विरोध म्हणजे काळ्या पैशांचे समर्थन, हा दावा खोडताना यशवंत सिन्हा म्हणाले, की 'एचएसबीसी' बॅंकेने ज्या 740 लोकांची यादी दिली, त्यांच्यावर केंद्र सरकारने काय कारवाई केली? पनामावर केंद्र सरकार कारवाई का करत नाही? याबाबत मी पंतप्रधानांना नऊ पानी पत्र लिहिले आहे. गेले वर्षभर मी भेट मागत आहे; पण मोदींनी मला वेळ दिलेली नाही. 

संघही उतरण्याची चिन्हे 
यशवंत सिन्हा यांनी देशाची अर्थव्यवस्था व सरकारचे अपयश चव्हाट्यावर मांडल्याने व त्यांना मिळणारा पाठिंबा पाहता आता भाजपची पितृसंस्था यात उतरण्याची शक्‍यता आहे. सिन्हा हे मुळात भाजपचे नसल्याने संघ यावर स्पष्टपणे बोलण्याचीही शक्‍यता आहे. सरसंघचालकांच्या दसरा भाषणात याबाबत पक्षांतर्गत टीकाकारांना सूचक संदेश दिला जाईल, असे खात्रीलायकरीत्या समजते. संघपरिवारातील संस्थांनी केंद्राला अडचणीत आणणारी टीका जाहीरपणे करू नये, असे निर्देश सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतेच जम्मूत दिले होते. सरसंघचालकांच्या दसरा भाषणात देशाची आर्थिक, सामाजिक, परदेश धोरणे यावरही भाष्य असेल असे समजते.

Web Title: marathi news marathi websites Indian Economy Demonetization Arun Jaitley Yashwant Sinha