'डेरा सच्चा सौदा'चे गुरमीत सिंग बलात्कार प्रकरणी दोषी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : आश्रमातील साध्वीवर बलात्कार केल्याप्रकरणी 'डेरा सच्चा सौदा'चे प्रमुख गुरमीत रामरहीम सिंग यांना आज (शुक्रवार) केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने दोषी ठरविले. गुरमीत सिंग यांना पोलिसांनी लगेचच ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. येत्या सोमवारी (28 ऑगस्ट) गुरमीत सिंग यांना शिक्षा सुनावली जाईल. 

या प्रकरणामध्ये किमान सात वर्षे आणि कमाल दहा वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. 

गेली 14 वर्षे सुरू असलेल्या या खटल्याचा आज निकाल लागणार असल्याने डेरा सच्चा सौदाच्या समर्थकांनी न्यायालयाच्या आवारात प्रचंड गर्दी केली होती. यामुळे प्रशासनाने लष्करी तुकड्याही तैनात केल्या होत्या. किंबहुना, या खटल्याचा निकाल लागण्यापूर्वी दोनच तास आधी पंजाब-हरियाना उच्च न्यायालयाने हरियाना सरकारला सुरक्षेविषयी सूचना दिल्या होत्या. तसेच, निर्णयानंतर कोणतेही प्रक्षोभक विधान किंवा कृती करणाऱ्या डेरा सच्चा सौदाच्या समर्थकांविरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने सरकारला दिले होते. 

'डेरा सच्चा सौदा' आणि गुरमीत राम रहीम सिंग प्रकरण नेमके आहे तरी काय?

'या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे', अशी ग्वाही हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिली होती. 'न्यायालयाचा निकाल काहीही लागला, तरीही राज्य सरकार त्या निर्णयाची अंमलबजावणी करेलच. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे', असे मुख्यमंत्री खट्टर यांनी सांगितले होते. 

या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर निमलष्करी दलाच्या 53 तुकड्या पंचकुलामध्ये तैनात करण्यात आल्या होत्या. जवळपास 50 हजार पोलिसही बंदोबस्तावर होते. न्यायालयात हजर होण्यासाठी गुरमीत सिंग सकाळी 9 वाजता सिरसा येथील त्यांच्या मुख्यालयातून निघाले, तेव्हा त्यांच्याबरोबर दोनशेहून अधिक वाहनांचा ताफा होता. पंचकुलामध्ये दाखल होण्यापूर्वी पोलिसांनी हा ताफा कमी करण्यास भाग पाडले. 

खटला काय होता? 
डेरा सच्चा सौदामधील एका साध्वीने 2002 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना निनावी पत्र लिहून गुरमीत सिंग यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार केली होती. गुरमीत सिंग यांनी इतरही अनेक महिलांवर बलात्कार केल्याचा उल्लेख त्या पत्रामध्ये होता.