भैयाजी जोशी पदावर कायम राहणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

गेली सहा वर्षे (दोन टर्म) सरकार्यवाह पदावर असलेले जोशी हे गेली दोन-तीन वर्षे प्रकृती अस्वास्थ्याशी झगडत आहेत. प्रथम डोळ्यांच्या व नंतर पायांच्या दुखण्याने त्यांना सतावले. मात्र, आता त्यांची प्रकृती पूर्ण बरी असून, लवकरच त्यांचा प्रवासही सुरू होईल असे सूत्रांनी सांगितले.

नवी दिल्ली : देशाच्या सत्तापक्षाचे दोर हाती असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीत अत्यंत महत्त्वाची असलेली कार्यकारी मंडळ बैठक तोंडावर आली असताना क्रमांक दोनच्या पदावरील सरकार्यवाह सुरेश ऊर्फ भैयाजी जोशी यांना विश्रांती दिली जाण्याची चर्चा असली, तरी भोपाळ बैठकीत तसा काहीही निर्णय होणार नाही, असे सूत्रांनी स्पष्टपणे 'सकाळ'ला सांगितले. 

मात्र, या बैठकीत कामगारवर्गाला सामाजिक सुरक्षा देण्याबाबतच्या प्रस्तावित विधेयकाबाबत चर्चा होईल. अर्थव्यवस्थेच्या दुरवस्थेवरून सरकारवर टीकास्त्र सोडणाऱ्या भारतीय मजदूर संघाने मोदी सरकारकडे ही मागणी लावून धरली आहे. याच बैठकीत देशभरातील प्रचारकांच्या बदल्या, भाजप संघटनमंत्र्यांच्या रिक्त जागांवरील नियुक्‍त्या व एखादा प्रस्ताव येण्याची शक्‍यता आहे. 

गेली सहा वर्षे (दोन टर्म) सरकार्यवाह पदावर असलेले जोशी हे गेली दोन-तीन वर्षे प्रकृती अस्वास्थ्याशी झगडत आहेत. प्रथम डोळ्यांच्या व नंतर पायांच्या दुखण्याने त्यांना सतावले. मात्र, आता त्यांची प्रकृती पूर्ण बरी असून, लवकरच त्यांचा प्रवासही सुरू होईल असे सूत्रांनी सांगितले. त्यांनी इच्छा व्यक्त केली तरच त्याच्या निवृत्तीवर विचार होऊ शकतो. मात्र, जोशी आणि वर्तमान सरसंघचालकांदरम्यान असलेला उत्तम संवाद पाहता ती शक्‍यताही दिसत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 

संघाची घटना पाहावी 
संघाच्या शस्त्रपूजनावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांनी 1949 मध्ये भारत सरकारला सादर झालेली संघाची घटना जरूर पाहावी व संघाच्या कामाची पद्धत नोंदणीवर अलवलंबून नाही हे लक्षात घ्यावे, असे सूत्रांनी सांगितले. भारिपचे प्रकाश आंबेडकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, शस्त्रपूजन ही शक्तीची उपासना असते. ती संघाने सुरू केलेली नाही तर या देशातील ती प्राचीन परंपरा आहे. कोणी शस्त्रांची पूजा करतो, तर कोणी लेखणीची. संघ ही व्यक्तींची संस्था (बॉडी ऑफ पर्सन्स) असल्याने धर्मादाय आयुक्तांकडे नोंद करण्याचे कारण नाही. संघाने पूर्णपणे मान्य केलेल्या भारतीय राज्यघटनेने लोकांना एकत्र येण्याचा अधिकार दिलेला आहे. संघ हा संकल्पना (स्टेटस) या बाबतीत समांतर आहे. मात्र, केशव स्मारक समिती, विदेश विभाग, जनकल्याण आदी विश्‍वस्त संस्था नोंदणीकृत आहेत. संघ बेकायदा असता तर तीन वेळा आलेल्या व उठविलेल्या बंदीच्या वेळचा खटला उभाच राहू शकला नसता. त्यामुळे संघाबाबत बोलण्याआधी अभ्यास करून बोलावे, असाही टोला सूत्रांनी लगावला. 

Web Title: marathi news marathi websites RSS Bhaiyyaji Joshi BJP Naredra Modi