उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा 'शहा-नीती'चा विजय 

Amit Shah
Amit Shah

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात 17 पैकी तब्बल 14 महापालिकांत घवघवीत विजय मिळविल्याने गुजरातेतील बातम्यांनी शांत शांत भासणाऱ्या भाजप मुख्यालयात आज पुन्हा चैतन्याचा संचार झाला. गुजरातच्या धामधुमीतही पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी या सर्व महापालिकांतील भाजप उमेदवारांच्या निवडीत लक्ष घातले होते व त्यांच्या निवडणूक व्यवस्थापन कौशल्याचा हा आणखी एक विजय असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. येत्या 18 तारखेला गुजरात व हिमाचल प्रदेशाच्या निवडणुकांत याच यशाची पुनरावृत्ती होईल, असा शहा यांचा विश्‍वास आहे. 

उत्तर प्रदेश व गुजरात येथील निवडणुकांचा आवाका व वातावरण सर्वस्वी भिन्न असले, तरी आजच्या निकालांनी भाजप कार्यकर्त्यांचे मनोबल वाढल्याचे स्पष्ट दिसले. हार्दिक पटेल यांच्या उदयानंतर भाजपच्या कोशातून 'हार्दिक अभिनंदन' हा शब्दच बाद झाला आहे. साहजिकच पंतप्रधानांपासून साऱ्यांच्या अभिनंदन ट्विटमध्ये 'हृदय से अभिनंदन' असा शब्दप्रयोग कटाक्षाने वापरला गेला. 

मायावतींच्या बसपमध्येही अलीगडसह दोन ठिकाणी विजय मिळाल्याने धुगधुगी आली आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी नवे प्रदशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडे यांच्यासह राज्यभरात धुवाधार प्रचार केला होता. या स्थानिक निवडणुका असल्या, तरी भाजप उमेदवारांची यादी शहांनी स्वत: डोळ्याखालून घातली होती. जातीय व धार्मिक समीकरणांचा आढावा घेऊन त्यांनी बूथनिहाय सूचना दिल्या होत्या. 2012 मध्ये ज्या 12 महापालिका भाजपने जिंकल्या होत्या, त्यापेक्षा वेगळ्या महापालिकांत कसा प्रचार करायचा हे वेळापत्रकच शहांनी अहमदाबादेत बसून तयार करून दिल्याचे समजते. मतदानाच्या दिवशी तर ते वेळात वेळ काढून गुजरातेतून लखनौला येऊन गेले होते. त्यांनी आखून दिलेल्या व्यवस्थापनाबरहुकूम प्रचार करताच आदित्यनाथ यांना त्याचे गोड फळ मिळाले. 

शहा यांनी दोन पानी निवेदन जारी करून आनंद व्यक्त केला. त्यांनी म्हटले, की मोदींचे 'सबका साथ सबका विकास' हे धोरण व उत्तर प्रदेशातील भाजप सरकारचे सुशासन व लोककल्याणकारी योजनांवर राज्यातील जनतेने पुन्हा दाखविलेला हा विश्‍वास आहे. जनता जनार्दनाचा हाच आशीर्वाद भाजपला गुजरात व हिमाचल प्रदेशातही मिळणार हे निश्‍चित आहे. गरीब, मागासवर्गीय, शोषित घटकांनी मोदींच्या विकासाभिमुख व जनहिताच्या निर्णयांवर पुन्हा मोहोर उमटवून जातीयवाद, घराणेशाही व लांगूलचालनाच्या राजकारणाला पुन्हा झिडकारले आहे. देशाच्या जनतेला विकास हवा आहे व मोदींच्या धोरणांवर गोरगरीब जनता खूश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com