विमानतळावरील हंगामा रेड्डींना भोवला

वृत्तसंस्था
शनिवार, 17 जून 2017

नवी दिल्ली - विमानतळावरील तोडफोड व कर्मचाऱ्यांशी घातलेली हुज्जत तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) खासदार जे. सी. दिवाकर रेड्डी यांना चांगलीच भोवली असून, एअर इंडिगोपाठोपाठ इतर प्रमुख विमान वाहतूक कंपन्यांनीही त्यांच्यावर बंदी घातली आहे. नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

दिवाकर रेड्डी गुरुवारी सकाळी विशाखापट्टनम येथून एअर इंडिगोच्या विमानाने हैदराबादकडे निघाले होते. मात्र, उड्डाणवेळेपूर्वी 45 मिनिटे अगोदर विमानतळावर उपस्थित राहणे असा नियम असताना ते 17 मिनिटे उशिरा दाखल झाले. कंपनीकडून बोर्डिंग पास न मिळाल्याने रेड्डी यांचा पारा चढला आणि त्यांनी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत तेथील साहित्याची तोडफोड केली. विमानतळावरील सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला आहे.

याप्रकरणी चौकशीचे आदेश देतानाच सदर प्रकाराची पूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे आश्वासन अशोक गजपती राजू यांनी आज दिले. दरम्यान, रेड्डी यांनी याप्रकरणी माफी मागितली असून, एअर इंडिगोसह एअर इंडिया, स्पाइस जेट, जेट एअरवेज, गो एअर आणि एअर एशिया इंडिया या प्रमुख विमान वाहतूक कंपन्यांनी त्यांना नो फ्लाय लिस्टमध्ये टाकले आहे. प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सदर कंपन्यांनी म्हटले आहे.

गेल्यावर्षी विजयवाडातील गन्नवरम विमानतळावरही रेड्डी यांनी अशाप्रकारे हंगामा केला होता. शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरही विमान कंपन्यांनी मध्यंतरी अशा प्रकारची बंदी घातली होती. रेड्डी यांना सदर विमानाचा बोर्डिंग पास मिळवून देण्यासाठी आपण हस्तक्षेप केल्याचे वृत्त साफ खोटे असून, या प्रकरणाच्या चौकशीअंती कायदेशीर परिणाम पाहावयास मिळतील. - अशोक गजपती राजू, नागरी विमान वाहतूकमंत्री