वंदे मातरम म्हणण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? - पंतप्रधान मोदी

वृत्तसंस्था
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

मी येथे आलो. पूर्ण ताकदीने वंदे मातरम, वंदे मातरम घोषणा ऐकू येत होत्या. अंगावर शहारे येतात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

नवी दिल्ली : आपण गंगेत कचरा टाकून त्यामध्ये आपण गंगेत पवित्र स्नान करू शकतो का? अशी घाण करून आपण वंदे मातरम म्हणू शकतो का, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. प्रथम शौचालये बांधा, मग मंदिरे बांधा, असा सल्लाही त्यांनी यावेळी पुन्हा एकदा दिला आहे.

शिकागो येथे सर्व धर्मांच्या शिखर परिषदेत स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या जगप्रसिद्ध भाषणाला सव्वाशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, तसेच भाजपचे दिवंगत नेते दीनदयाळ उपाध्याय यांच्या शताब्दीनिमित्त आयोजित 'स्टुडंट्स लीडर्स कन्व्हेंशन' कार्यक्रमात विद्यार्थ्यांना उद्देशून मोदी बोलत होते. सर्व विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. 

मी येथे आलो. पूर्ण ताकदीने वंदे मातरम, वंदे मातरम घोषणा ऐकू येत होत्या. अंगावर शहारे येतात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 
ते म्हणाले, 'विद्यापीठाच्या निवडणुकांमध्येही स्वच्छतेला महत्त्व द्यावे. स्वामी विवेकानंदांनी सांगितले होते की, जगातील समस्यांवर आशियातून उत्तरे मिळतील. अखंड आशियाची संकल्पना विवेकानंदांनी 125 वर्षांपूर्वी मांडली. विवेकानंदांनी भारताच्या बलस्थानांचा प्रसार जगभरात केला.'

भारत बदलत आहे. जागतिक व्यासपीठावर भारताचे स्थान उंचावत आहे. जनशक्तीमुळे हे शक्य होत आहे. सर्जनशीलतेशिवाय जीवन नाही. आपल्या सर्जनशीलतेला बहरू द्या, आणि आपल्या लोकांच्या आकांक्षा पूर्ण होऊ द्या. सर्जनशीलता आणि नवोन्मेषासाठी विद्यापीठाच्या आवारांशिवाय दुसरं कोणतं चांगलं ठिकाण नाही.

विद्यार्थ्यांनो, अपयशाला घाबरू नका. ज्ञान आणि कौशल्य या दोन्हीला समान महत्त्व आहे. स्वामी विवेकानंदांची प्रत्येक गोष्ट आजही आपल्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. तुम्ही महिलांकडे आदराने पाहता का, असे विचारत मोदींनी विद्यार्थ्यांना महिलांविषयीच्या दृष्टिकोनाबद्दल आत्मपरीक्षण करण्याची जाणीव करून दिली. 
स्वामी विवेकानंद आणि जमशेदजी टाटा यांच्यामधील पत्रव्यवहारावरून हे दिसून येते की, भारत स्वावलंबी व्हावा याबाबत स्वामीजींना आस्था होती. भारतातील पहिल्या हरित क्रांतीमधून विवेकानंदांच्या कल्पना प्रत्यक्षात आल्याचे दिसते.