बंदी असलेल्या वस्तूंचा ओघ वाढला

पीटीआय
सोमवार, 10 जुलै 2017

नवी दिल्ली - देशात बंदी असलेल्या वस्तू परदेशातून मोठ्या प्रमाणात येत असून, सीमा शुल्क विभाग दैनंदिन पातळीवर कारवाई करत अशा वस्तू मोठ्या प्रमाणात जप्त करत आहे. यात ड्रोन, सेक्‍स टॉइज, रिमोट कंट्रोलवरील हेलिकॉप्टर यांचा समावेश आहे.

नवी दिल्ली - देशात बंदी असलेल्या वस्तू परदेशातून मोठ्या प्रमाणात येत असून, सीमा शुल्क विभाग दैनंदिन पातळीवर कारवाई करत अशा वस्तू मोठ्या प्रमाणात जप्त करत आहे. यात ड्रोन, सेक्‍स टॉइज, रिमोट कंट्रोलवरील हेलिकॉप्टर यांचा समावेश आहे.

दिल्लीतील विदेश टपाल कार्यालयातच अशा वस्तूंची एक हजार पार्सल ताब्यात घेण्यात आली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ, अश्‍लील साहित्य, सेक्‍स टॉइज यासोबत बंदी असलेले ड्रोन आणि रिमोटवरील हेलिकॉप्टर अशा वस्तू देशात आणण्यात येत आहेत. ड्रोन आणि रिमोटवरील हेलिकॉप्टर आणण्यासाठी सरकारी यंत्रणांची परवानगी आवश्‍यक असते. देशात या वस्तू पार्सलने येत असून, चीनसह ब्रिटन आणि अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात अशी पार्सल येत आहेत. यात अश्‍लील साहित्याचा मोठा समावेश आहे.

नियमानुसार ही पार्सल जप्त करण्यात येत आहेत. अशा वस्तूंची परदेशातून येणारी आणि देशातून बाहेर जाणारी पार्सल विदेश टपाल कार्यालयात जप्त करण्यात येत आहेत. योग्य माहिती नसलेली आणि आतमध्ये बंदी असलेल्या वस्तू असलेली पार्सल विदेश टपाल कार्यालयात जप्त करण्यात येत आहेत; मात्र कार्यालयातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे यावर मर्यादा येत आहे. यासाठी सीमा शुल्क विभागाने विदेश टपाल कार्यालयाला सर्व प्रक्रिया संगणकीकृत करण्याची सूचना केली आहे.

तस्करीसाठी पार्सलचा वापर
विदेश टपाल कार्यालयातून पाठविल्या जाणाऱ्या पार्सलमधून अमली पदार्थ आणि बंदी असलेल्या वस्तूंची तस्करी होत आहे. कार्यालयातून दररोज सुमारे पाच हजार पार्सल निर्यात, तर साडेतीन हजार पार्सल आयात होत आहेत. आयात शुल्क टाळण्यासाठीही या मार्गाचा वापर केला जात आहे.