बिहारमध्ये कायद्याचे राज्य नाही: राजीव प्रताप रुडी

वृत्तसंस्था
शनिवार, 15 जुलै 2017

बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी बिहारमध्ये कायद्याचे राज्य नसल्याची टीका केली आहे.

नवी दिल्ली : बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी बिहारमध्ये कायद्याचे राज्य नसल्याची टीका केली आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रुडी बोलत होते. ते म्हणाले, "एकूण 11 कोटी लोकसंख्या असलेल्या बिहारमधील 4 कोटी लोक भ्रष्टाचार आणि बिहारमध्ये विकासापेक्षा जात श्रेष्ठ समजली जात असल्याने बिहारच्या बाहेर राहतात. बिहारमध्ये प्रशासन नाही आणि तेथील राजकारण जातीच्या भोवती फिरते. भ्रष्टाचार आणि विकास हा तेथे विषयच नाही.' बिहारमधील सद्यस्थितीबाबत विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना रुडी म्हणाले, "तेथे कायद्याचे राज्य नाही. तेथे कायद्यापेक्षा सत्ता, कुटुंब आणि जातीचे वर्चस्व आहे. त्यामुळे तेथे जर कोणी धमकी देत असेल तर त्यात आश्‍चर्य काहीही नाही.' निवडणुकीपूर्वी सर्व जण गोड बोलतात. मात्र मतदानादरम्यान जे काही होतं ते सारं जातीवर आधारित होतं, असेही रुडी म्हणाले.

लालूप्रसाद यादव आणि त्यांचे कुटुंबिय सर्व प्रकारांबद्दल केंद्र सरकारला दोष देतात. "तुम्ही रेल्वेमंत्री होता. तुम्ही कंत्राट दिले होते. तुम्ही बनावट कंपनी तयार केली. तुम्ही स्वत:लाच त्याचे संचालक बनवता आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांना संचालक केले. त्यानंतर तुम्ही म्हणता की कंपनीमध्ये सहभागी झालेले तुमचे मुले सर्वात तरुण आहेत', असे म्हणत रुडी यांनी यादव कुटुंबियांवर टीका केली.