म्यानमार सीमेवर भारतीय लष्कराचा 'सर्जिकल स्ट्राईक'

वृत्तसंस्था
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

उरीमध्ये 29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय लष्कराने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. त्या सर्जिकल स्ट्राईकला एक वर्ष पूर्ण होत असतानाच लष्कराने म्यानमारच्या सीमेवर नवा सर्जिकल स्ट्राईक केला आहे.

नवी दिल्ली : म्यानमारच्या सीमेवर लपून बसलेल्या नागा बंडखोरांच्या छावण्या भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक करून उद्ध्वस्त केल्याचे वृत्त आहे. 

आज (बुधवार) पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत मोठ्या संख्येने नागा बंडखोर मारले गेल्याचे भारतीय लष्कराच्या पूर्व मुख्यालयाने म्हटले आहे. भारतीय लष्कराने म्यानमारची सीमा न ओलांडता ही कारवाई केल्याचे मुख्यालयाने स्पष्ट केले आहे. 

इंडियन पॅरा कमांडोंच्या नेतृत्वाखालील टीमने एनएससीएन-के गटाच्या नागा बंडखोरांच्या छावण्यांवर हल्ला चढवला. भारत-म्यानमार सीमेवर लांगखू खेड्याजवळ ही कारवाई झाली आणि यामध्ये एकही भारतीय जवान जखमी अथवा मरण पावलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले. 

भारतीय लष्कराने म्यानमार सीमेवर केलेला हा दुसरा सर्जिकल स्ट्राईक आहे. यापूर्वी जून 2015 मध्ये एनएससीएन-के गटाच्या बंडखोरांव हल्ला चढविला होता. या गटाने त्यापूर्वी केलेल्या हल्ल्यात अठरा भारतीय जवान शहीद झाले होते. 

उरीमध्ये 29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय लष्कराने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. त्या सर्जिकल स्ट्राईकला एक वर्ष पूर्ण होत असतानाच लष्कराने म्यानमारच्या सीमेवर नवा सर्जिकल स्ट्राईक केला आहे. 

गरज पडल्यास भारत सर्जिकल स्ट्राईक करू शकतो, असा इशारा भारतीय लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी नुकताच दिला होता. 'सर्जिकल स्ट्राईकमुळे ज्यांना जो संदेश जायचा होता, त्यांना तो गेला आहे. आम्हाला नेमके काय म्हणायचे आहे हे त्यांना (पाकिस्तानला) समजले आहे. गरज पडली, तर ही पद्धत आम्ही आणखी वापरू शकतो,' असे रावत म्हणाले होते.

नागालँडमधील द नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड-खापलांग (एनएससीएन-के) गटाने भारत सरकारशी 2001 मध्ये शस्त्रसंधी केली होती. हा करार या बंडखोर गटाने 27 मार्च 2015 रोजी तोडला. त्यानंतर या गटाने भारतीय लष्करावर सातत्याने हल्ले चढविले आहेत. चार जून 2015 रोजी खापलांग गटाच्या बंडखोरांनी 6 डोग्रा रेजिमेंटवर मणिपूरच्या चांडेल जिल्ह्यात हल्ला केला होता. त्यामध्ये 18 जवान शहीद झाले होते. खापलांग या म्होरक्याचा नऊ जून रोजी मृत्यू झाला आहे. 

सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?
शत्रू देशाच्या हद्दीत प्रवेश करून आपल्या विरोधात सुरू असलेल्या कारवाया नष्ट करणे म्हणजे‘सर्जिकल स्ट्राईक. सर्जिकल स्ट्राईकचा अत्यंत कमी वेळासाठी वापर केला जातो. अशा प्रकारची कारवाई करायची असेल तर हवाई दलाची परवानगी घ्यावी लागते. अमेरिकेने 2003 मध्ये सर्जिकल स्ट्राईकचा वापर करून इराक युद्धादरम्यान बगदादमध्ये बॉम्बद्वारे हल्ले केले होते. शिवाय, सिरीयाने सद्दाम हुसैन यांच्या विरोधात सर्जिकल स्ट्राईक केले होते. 

पाकव्याप्त काश्मीरमध्ये असा केला होता सर्जिकल स्ट्राईक
भारतीय लष्कराने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये गेल्यावर्षी केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक‘ची योजना सात दिवसांपासून सुरू होती. भारताने केलेल्या या कारवाईत 38 दहशतवादी तर 9 पाकिस्तानचे सैनिक ठार झाले होते. असा झाला होता गेल्यावर्षीचा सर्जिकल स्ट्राईक : 

  • भारतीय लष्कराची हेलिकॉप्टर 12.30 वाजता पाकव्याप्त काश्मीरमध्ये दाखल.
  • पाकव्याप्त काश्मीरमध्ये दोन किलोमीटर आंतर आतमध्ये जाऊन कारवाई.
  • भारतीय कमांडो दहशतवादी तळापर्यंत पायी गेले.
  • दहशतवाद्यांच्या सात तळांवर हल्ले करून नष्ट केले.
  • भिंबर, लीपा, केल, हॉटस्ट्रिंगमधील दहशतवादी नष्ट.
  • पहाटे 4.30 वाजेपर्यंत कारवाई चालली.
  • ‘सर्जिकल स्ट्राईक‘ पूर्ण करून जवान परत.