हुतात्मा राज्याचे नसतात, देशाचे असतात; गुजरातमधील वीरपत्नी

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 मे 2017

"केवळ ज्यांनी आपला मुलगा, पती, भाऊ किंवा पती गमावला आहे तेच आमच्या वेदना जाणू शकतात. कारगिलमध्ये जे तेरा जवान हुतात्मा झाले त्यामध्ये माझा मुलगाही होता. आमचे दु:ख आणि मुकेशला गमावल्याच्या भावना अखिलेश यांच्यासारख्या राजकारण्यांच्या आकलनाच्या पलिकडील आहेत', अशा भावविवश प्रतिक्रिया मुकेश यांच्या आईने व्यक्त केल्या. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते.

अहमदाबाद (गुजरात) : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी हुतात्म्यांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नाराज झालेल्या गुजरातमधील हुतात्मा जवान मुकेश राठोड यांच्या पत्नीने 'हुतात्मा राज्याचे नसतात, देशाचे असतात', अशा प्रतिक्रिया व्यक्त करत यादव यांना प्रत्युत्तर दिले आहे.

'उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दक्षिण भारत या साऱ्या ठिकाणांवरील जवान हुतात्मा झाले आहेत. गुजरातमधील कोणी हुतात्मा झाले असेल तर कळवा', असे म्हणत यादव यांनी गुजरातमधील नागरिकांच्या देशभक्तीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. यादव यांच्या प्रतिक्रियेनंतर 1999 मधील कारगिल युद्धात हुतात्मा झालेले गुजरातमधील जवान मुकेश राठोड यांच्या कुटुंबात नाराजी पसरली. 'अहमदाबाद मिरर'शी बोलताना राठोड यांच्या पत्नी राजश्री राठोड म्हणाल्या, 'अखिलेश यांची प्रतिक्रिया हृदय पिळवटून टाकणारी आहे. टीव्हीवर आम्ही त्यांची प्रतिक्रिया पाहिल्यापासून त्याच विषयावर चर्चा करत आहोत. हुतात्मा हे राज्याचे नसतात. ते देशाचे असतात. त्यांच्या जाण्याचे एका राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे नुकसान होत असते.'

राजश्री राठोड या पाच महिन्याच्या गर्भवती असताना त्यांचे पती हुतात्मा झाले. त्यांचा मृगेश नावाचा मुलगा आज सतरा वर्षांचा आहे. 'केवळ ज्यांनी आपला मुलगा, पती, भाऊ किंवा पती गमावला आहे तेच आमच्या वेदना जाणू शकतात. कारगिलमध्ये जे तेरा जवान हुतात्मा झाले त्यामध्ये माझा मुलगाही होता. आमचे दु:ख आणि मुकेशला गमावल्याच्या भावना अखिलेश यांच्यासारख्या राजकारण्यांच्या आकलनाच्या पलिकडील आहेत', अशा भावविवश प्रतिक्रिया मुकेश यांच्या आईने व्यक्त केल्या. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते.