मायानगरी बनली श्रीमंतांचे शहर

वृत्तसंस्था
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

'पुणे तिथे काय उणे'
विद्येचे माहेरघर असणारे पुणे श्रीमंत शहरांच्या यादीमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. पुण्याची एकूण संपत्ती 180 अब्ज डॉलर असून, पुण्यात 4,500 कोट्यधीश, तर पाच अब्जाधीश राहत आहेत. एकूणच चारही दिशांनी विस्तारणाऱ्या या शहराचा विकास झपाट्याने होत असून, या शहरामध्ये श्रीमंतांची संख्याही लक्षणीय आहे.

नवी दिल्ली : स्वप्नांचे शहर, मायानगरी अशा एक ना अनेक बिरुदावल्या मिळालेली भारताची आर्थिक राजधानी मुंबई हे देशातील सर्वांत श्रीमंत शहर बनले आहे. मुंबईत 46,000 कोट्यधीश, 28 अब्जाधीश वास्तव्य करत आहे. एका अहवालानुसार मुंबईची एकूण संपत्ती 820 अब्ज डॉलर आहे.

"न्यू वर्ल्ड वेल्थ'ने नुकत्याच तयार केलेल्या अहवालानुसार मुंबई देशातील सर्वांत श्रीमंत शहर झाल्याचे समोर आले आहे. श्रीमंत शहरांच्या यादीमध्ये देशाची राजधानी दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटकची राजधानी बंगळूर आहे. दिल्लीमध्ये कोट्यधीशांची संख्या 23,000 तर 18 अरबपती आहेत. दिल्लीची एकूण संपत्ती 450 अब्ज डॉलरवर पोचली आहे. याचसोबत बंगळूरची एकूण संपत्ती 320 अब्ज डॉलर असून, तेथे 7,700 कोट्यधीश, तर आठ अब्जाधीश राहत आहेत.
श्रीमंत शहरांच्या यादीमध्ये हैदराबाद चौथ्या स्थानावर असून, या शहराची संपत्ती 310 अब्ज डॉलर आहे. हैदराबादमध्ये 9,000 कोट्यधीश असून, सहा अब्जाधीश आहेत. कोलकत्यात 9,600 कोट्यधीश असून, 4 अब्जाधीश वास्तव्यास आहेत. कोलकत्याची एकूण संपत्ती 290 अब्ज डॉलर झाली आहे.

श्रीमंत शहरांच्या यादीमध्ये चेन्नईचाही समावेश असून, या शहराची एकूण संपत्ती 150 अब्ज डॉलरब्ज आहे. येथे 6,600 कोट्यधीश, तर चार अब्जाधीश आहेत. तसेच गुडगाव शहराची एकूण संपत्ती 110 अब्ज डॉलर अब्ज असून या शहरात 4,000 कोट्यधीश आणि दोन अब्जाधीश आहेत.
श्रीमंत शहरांच्या यादीमध्ये सूरत, अहमदाबाद, विशाखापट्टणम, गोवा, चंडीगड, जयपूर व बडोद्याचाही समावेश आहे. देशामध्ये एकूण 6,200 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. ही आकडेवारी डिसेंबर, 2016 पर्यंतची आहे. देशात एकूण कोट्यधीशांची संख्या 2 लाख 64 हजार असून, 95 अब्जाधीश आहेत.

देशातील प्रमुख श्रीमंत शहरे
शहर कोट्यधीश अब्जाधीश
मुंबई 46,000 28
दिल्ली 23,000 18
बंगळूर 7,700 8
हैदराबाद 9,000 6
कोलकता 9,600 5
पुणे 4,500 5
चेन्नई 6,600 4
गुडगाव 4,000 2

Web Title: mayanagari mumbai city of rich people