मतदान यंत्रांचा मुद्दा न्यायालयात नेणार : मायावती

वृत्तसंस्था
बुधवार, 15 मार्च 2017

भाजप खरोखरच प्रमाणिक असेल आणि लोकशाहीशी एकनिष्ठ असेल, तर तातडीने पारंपरिक मतपत्रिकेद्वारे नव्याने निवडणुकीचे आदेश द्यावेत. त्यातून लोकशाहीची हत्या कोणी केली, हे सिद्ध होईल; मात्र ते यासाठी तयार नाहीत.

लखनौ - बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी मतदान यंत्रांत छेडछाड झाल्याचा आरोप करत याविरुद्ध न्यायालयात जाण्याचा निर्णय बुधवारी घेतला. त्याचप्रमाणे भाजपकडून लोकशाहीची हत्या झाल्याचे सांगत दर महिन्याला "काळा दिवस' पाळला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.

उत्तर प्रदेश निवडणुकीत अप्रामाणिकपणा आणि फसवणुकीच्या माध्यमातून भाजपने विजय मिळविला आहे, असा आरोप मायावती यांनी केला. त्या म्हणाल्या, की निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदविली होती; मात्र अद्याप त्याला योग्य उत्तर मिळाले नसल्यामुळे भविष्यात अशा प्रकारची फसवणूक होऊ नये आणि लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही याप्रकरणी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधण्यासाठी आयोजित पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना मायावती यांनी ही माहिती दिली. 403 सदस्यांच्या सभागृहात बसपला अवघ्या 19 जागा जिंकण्यात यश आले आहे. मावळत्या विधानसभेत त्यांचे 80 आमदार होते.

आमच्या पक्षात उत्तर प्रदेश आणि अन्य राज्यांत हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आणण्यासाठी एक आंदोलन उघडण्याचाही निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातील सर्व जिल्हा मुख्यालयांत, तसेच अन्य राज्यांतील राज्य मुख्यालयांत प्रत्येक महिन्याच्या 11 तारखेला पक्ष काळा दिवस पाळणार आहे. याच दिवशी भाजपने लोकशाहीची हत्या केली असून, 11 एप्रिलला पहिल्यांदा नोटाबंदीचा निर्णय घेतला गेला होता, असे मायावती यांनी सांगितले.

भाजप खरोखरच प्रमाणिक असेल आणि लोकशाहीशी एकनिष्ठ असेल, तर तातडीने पारंपरिक मतपत्रिकेद्वारे नव्याने निवडणुकीचे आदेश द्यावेत. त्यातून लोकशाहीची हत्या कोणी केली, हे सिद्ध होईल; मात्र ते यासाठी तयार नाहीत.
- मायावती, बसपप्रमुख