अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या मेसमधून मटण गायब!

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 मार्च 2017

उत्तर प्रदेश सरकारने अनधिकृत कत्तलखान्यांविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईमुळे अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या उपहारगृहातून मटण गायब झाल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. शिवाय, चिकन आणि भाज्यांच्या किंमतीत वाढ झाल्याने मेसचे दर वाढण्याची चिंताही व्यक्त केली आहे.

अलिगढ - उत्तर प्रदेश सरकारने अनधिकृत कत्तलखान्यांविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईमुळे अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या उपहारगृहातून मटण गायब झाल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. शिवाय, चिकन आणि भाज्यांच्या किंमतीत वाढ झाल्याने मेसचे दर वाढण्याची चिंताही व्यक्त केली आहे.

अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील मेसमध्ये यापूर्वी आठवड्यातून दोन वेळा मटण देण्यात येत होते. मात्र गेल्या आठवडाभर केवळ शाकाहारी पदार्थच देण्यात येत असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. याबाबत वृत्तसंस्थेशी बोलताना एएमयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष फैझल हसन म्हणाला, "गेल्या सहा-सात दिवसांपासून मटणाचा कोणताही पदार्थ देण्यात आलेला नाही. सर्वांत मोठी चिंता म्हणजे या सर्व प्रकारामुळे मेसचे दर वाढण्याची भीती आहे. चिकनच्या किंमती 120 रुपये प्रतिकिलोवरून 220 रुपयांवर पोचल्या आहेत. तर, भाज्यांचे दरही वाढले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. कत्तलखाने बंद केल्यामुळे ज्या लोकांचे निर्वाहाचे साधन बंद झाले आहे, त्यांची अडचण सोडविण्याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याचा विचार करत आहोत', असेही हसन पुढे म्हणाला.

विद्यार्थ्यांना गेल्या आठवड्याभरापासून शाकाहारी जेवण देण्यात येत आहे. या बाबत बोलताना विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी ओमर पीरजादा म्हणाले, "हा तात्पुरता प्रश्‍न आहे. आम्ही विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहोत. मटणाची किंमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे आम्ही ही (शाकाहारी जेवण) तात्पुरती सोय केली आहे.'

या प्रकरणी कुलगुरुंनी हस्तक्षेप करावा, यासाठी एएमयूने त्यांना पत्रही लिहिले आहे. त्यावर "विद्यापीठात कत्तलखाना नसतानाही विद्यापीठातील 19 उपहारगृहांमध्ये दररोज 500 किलो मटण पुरवावे असे म्हणण्यात काही अर्थ नाही', असे स्पष्टीकरण विद्यापीठ प्रशासनाने दिले आहे.