काश्‍मीरप्रश्‍नी मोदींची सर्वांशी चर्चेची तयारी 

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 एप्रिल 2017

"दोन-तीन महिन्यांत परिस्थिती सुधारेल' 
मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचीही भेट घेऊन काश्‍मीरमधील स्थितीविषयी चर्चा केली. त्यानंतर बोलताना मेहबूबा म्हणाल्या, की राज्यातील परिस्थितीत येत्या दोन-तीन महिन्यांत सुधारणा होईल आणि त्यानंतर सर्व फुटीरतावाद्यांशी चर्चेला सुरवात होईल. 

नवी दिल्ली - काश्‍मीर खोऱ्यातील तणाव निवळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुटीरतावाद्यांसह सर्वांशी चर्चेची तयारी दर्शविल्याची माहिती जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज येथे दिली. चर्चेसाठी वातावरणनिर्मिती करण्याची गरज असल्यावर मेहबूबा यांनी भर दिला. 

दगडफेक आणि गोळीबारादरम्यान चर्चा होऊ शकत नाही, असे मेहबूबा यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी सुमारे 20 मिनिटे चर्चा झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. 
बैठकीत त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काश्‍मीर धोरणाचा मुद्दा उपस्थित केला आणि सांगितले, की फुटीरतावाद्यांशी चर्चेसाठी वाजपेयी यांनी ज्या ठिकाणी चर्चेचा धागा आणून ठेवला होता, तेथून तो उचलला पाहिजे. पंतप्रधानांनीही परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर चर्चेचा हेतू स्पष्ट केला आहे. 

श्रीनगर लोकसभा मतदारसंघासाठी 9 एप्रिलला झालेल्या पोटनिवडणुकीपासून काश्‍मीरमधील हिंसाचारात वाढ झाली आहे. सुरक्षा दलांना दररोज निदर्शने आणि दगडफेकीच्या घटनांना सामोरे जावे लागत असल्याने ते दबावाखाली आहेत. 
आणखी किती काळ तुम्ही संघर्षाचा सामना करू शकता. चर्चा हा एकमेव पर्याय आहे, असे सांगत मेहबूबा म्हणाल्या, की वाजपेयी पंतप्रधान आणि लालकृष्ण अडवानी उपपंतप्रधान असताना हुरियत कॉन्फरन्सशी चर्चा सुरू झाली होती. वाजपेयी यांनी ज्या ठिकाणी चर्चा आणून सोडली, तेथून पुन्हा सुरू करण्याची आम्हाला गरज आहे. चर्चा हा एकमेव मार्ग आहे. 

खोऱ्यातील दगडफेकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, की काही युवकांचा भ्रमनिराश झाला आहे, तर फेसबुक आणि व्हॉट्‌सऍप यांसारख्या सोशल मीडियाचा वापर करून काही जणांना चिथावणी दिली जात आहे. 

काश्‍मीरमधील सुरक्षा व्यवस्था हाताळण्यात अपयश येत असल्यावरून पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट आणि भाजप आघाडीमधील वाढत्या तणावासंबंधी मेहबूबा म्हणाल्या, की दोन्ही पक्षांदरम्यान आतापर्यंत जे काही घडले ते घडायला नको होते; मात्र हा अंतर्गत मुद्दा आहे आणि भाजपबरोबर आम्ही तो सोडवू. 

सिंधु पाणीवाटपाचा मुद्दाही उपस्थित करत राज्याचे 20 हजार कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाल्याचे नमूद केले. पंतप्रधानांनी राज्याला नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. 

"दोन-तीन महिन्यांत परिस्थिती सुधारेल' 
मुफ्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचीही भेट घेऊन काश्‍मीरमधील स्थितीविषयी चर्चा केली. त्यानंतर बोलताना मेहबूबा म्हणाल्या, की राज्यातील परिस्थितीत येत्या दोन-तीन महिन्यांत सुधारणा होईल आणि त्यानंतर सर्व फुटीरतावाद्यांशी चर्चेला सुरवात होईल.