काश्मीरमधील तणावामागे चीनचा हात: मुफ्ती

वृत्तसंस्था
शनिवार, 15 जुलै 2017

काश्मीरमध्ये सुरु असलेल्या लढाईमध्ये बाहेरील शक्ती काम करत आहे. चीननेही आता लक्ष घालण्यास सुरवात केली आहे. मला आनंद आहे, की काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत.

नवी दिल्ली - काश्मीर खोऱ्यातील तणावामागे परकीय शक्तींचा हात असून, आता चीननेही येथे लक्ष घालण्यास सुरवात केल्याचे जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहे.

हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वणीला ठार मारल्यानंतर काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी कारवायांमध्येही मोठी वाढ झाली आहे. दगडफेकीच्या घटनाही वारंवार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची आज (शनिवार) भेट घेतली. या भेटीनंतर त्यांना काश्मीरमधील वातावरण दूषित करण्यासाठी परकीय शक्ती काम करत असल्याचे म्हटले आहे.

मुफ्ती म्हणाल्या, की काश्मीरमध्ये सुरु असलेल्या लढाईमध्ये बाहेरील शक्ती काम करत आहे. चीननेही आता लक्ष घालण्यास सुरवात केली आहे. मला आनंद आहे, की काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. काश्मीरमधील समस्यांना सर्व मिळून तोंड देत आहेत. काश्मीरमध्ये आम्ही कायदा आणि सुव्यवस्था लादत नाही. जोपर्यंत पूर्ण प्रदेश आणि राजकीय पक्ष मदत करत नाहीत, तोपर्यंत परकीय शक्तींविरोधातील लढाई जिंकू शकत नाही.

ई सकाळवरील ताज्या बताम्यांसाठी क्लिक करा :