शशी थरुरांशी वैयक्तिक संबंध नव्हते - तरार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

शशी थरूर यांना एकदा भारतात आणि एकदा दुबईत भेटले होते.

नवी दिल्ली - सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणाच्या तपासांतर्गत दिल्ली पोलिसांनी पाकिस्तान पत्रकार मेहेर तरार यांची चौकशी केली असून, या चौकशी दरम्यान तरार यांनी आपले थरुर यांच्याशी कोणतेही वैयक्तिक संबंध आणि जवळीक नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

सुनंदा यांचे पती तसेच माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर आणि मेहेर तरार यांच्यातील संबंधांमुळे सुनंदा पुष्कर तणावाखाली होत्या आणि गेल्या वर्षी मृत्युपूर्वी यावरून त्यांच्यात भांडण झाले होते, अशी अंदाज वर्तविण्यात येत होता. त्यामुळे तरार यांची चौकशी होण्याची शक्यता होती. अखेर फेब्रुवारी महिन्यात तरार यांची दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने फेब्रुवारी महिन्यात सुमारे तीन तास चौकशी केल्याचे समोर आले आहे. पुष्कर यांचा मृतदेह दक्षिण दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये आढळून आला होता.

तरार यांनी म्हटले आहे की, सुनंदा यांचा मृत्यू होण्यापूर्वी 2014 मध्ये मी त्यांच्याशी ट्विटरवरून संवाद साधला होता. या प्रकरणी मी कटकारस्थानाचा बळी ठरत आहे. शशी थरूर यांना एकदा भारतात आणि एकदा दुबईत भेटले होते. मात्र, या दोन्ही भेटी या सार्वजनिक वातावरणात झाल्या आणि त्या वेळी इतरही माणसे तेथे उपस्थित होती.