श्रीमंतांना खाली खेचून गरिबांचा विकास नको- भागवत

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 27 मार्च 2017

आजकाल सब का साथ सब का विकास ही घोषणा देशात बरीच ऐकू येते. ही घोषणाही धर्माच्याच आधारावर आहे. व्यक्ती व समूह यांना सोबत घेऊन जातो तो धर्म. विकासाचे प्रारूप कसे हवे हे जो लागू करतो त्यालाच कळते. त्यामुळे, सब का साथ... अशी घोषणा केवळ भारतातच दिली जाऊ शकते.

नवी दिल्ली - सब का साथ सब का विकास म्हणताना, श्रीमंतांना खाली ओढून गरिबांचा विकास होणार नाही व याच्या उलटेही होणार नाही, असे सूचक वक्तव्य सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले. "नोटाबंदीमुळे देशातील श्रीमांतांना आम्ही रांगेत उभे केले,' असे सांगणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारला संघाने अप्रत्यक्षरीत्या या कानपिचक्‍या दिल्याचे मानले जात आहे. 

संसदीय ग्रंथालयात झालेल्या नानाजी देशमुख स्मृती व्याख्यानमालेत बोलताना भागवत यांनी भारताला धर्माधारित विकासच तारू शकेल अशी मांडणी जोरकसपणे केली. मोदी सरकारकडून, नोटाबंदीनंतर श्रीमंतांना कसा त्रास झाला हे ठसविले जात आहे; मात्र संघाचा त्या मांडणीलाही अंतस्थ विरोध असल्याचे सरसंघचालकांच्या वक्तव्याच्या आशयातून दिसून आले आहे.

ते म्हणाले, "अर्थ- काम- मोक्ष या तिन्ही पुरुषार्थांचा पाया धर्म आहे. एकात्म मानवदर्शनाच्या संकल्पनेत सर्व समाजाचा धर्माधारित व सर्वंकष विकास अभिप्रेत आहे. भारतीय धर्म हा निव्वळ पूजा-प्रार्थना पद्धतीवर आधारित नसून तो आदर्श वर्तन व सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या तत्त्वावर आधारित आहे. भारतीय विचार व व्यवस्था यांचा आधारच धर्म आहे.'' "भारतात जोवर धर्म आहे, तोवर भारताला संपविण्याची ताकद जगातील कोणातही नाही, हे विवेकानंदांचे वचन त्यांनी उद्‌धृत केले. अंत्योदय ही विकासाची कसोटी गांधीजींनाही मान्य होती व "धर्म म्हणजे मूल्यांचा समुच्चय,' असे डॉ. आंबेडकर म्हणत असत, असाही दावा त्यांनी केला. 

"आजकाल सब का साथ सब का विकास ही घोषणा देशात बरीच ऐकू येते,' असा टोला लगावून भागवत म्हणाले, ""ही घोषणाही धर्माच्याच आधारावर आहे. व्यक्ती व समूह यांना सोबत घेऊन जातो तो धर्म. विकासाचे प्रारूप कसे हवे हे जो लागू करतो त्यालाच कळते. त्यामुळे, सब का साथ... अशी घोषणा केवळ भारतातच दिली जाऊ शकते.

अखेरच्या पायरीवरच्या, सर्वांत विपन्नावस्थेतील माणसाचा विकास म्हणजे "सब का विकास' होय. मात्र, हा विकास श्रीमंतांना खाली ओढून होऊ शकत नाही. विकास हा सर्व समाजाच्या परिश्रमांतून व्हावा. समाजाला आळशी बनविणारा नको. भारतासाठी धर्माधारित विकास अत्यावश्‍यक आहे. यामुळेच एकात्म मानवदर्शनाच्या मॉडेलचे अनुकरण उद्या संपूर्ण जग करेल,'' असा दावा भागवत यांनी केला.