केंद्रीय गृहमंत्रालयाचे संकेतस्थळ हॅक!

वृत्तसंस्था
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाचे संकेतस्थळ आज (रविवार) सकाळी हॅक झाले आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर राष्ट्रीय माहिती केंद्राने (एनआयसी) तातडीने हे संकेतस्थळ ब्लॉक केले आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाचे संकेतस्थळ आज (रविवार) सकाळी हॅक झाले आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर राष्ट्रीय माहिती केंद्राने (एनआयसी) तातडीने हे संकेतस्थळ ब्लॉक केले आहे.

केंद्र आणि राज्य सरकारच्या संकेतस्थळांमध्ये सायबर सिक्‍युरीटीचा अभाव असल्याचे वृत्त नुकतेच समोर आले होते. या पार्श्‍वभूमीवर गृह मंत्रालयाचे संकेतस्थळ हॅक होण्याच्या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. आज सकाळी दिल्ली पोलिसांना एका व्यक्तीने गृह मंत्रालयाचे संकेतस्थळ दिसत नसल्याची माहिती दिली. त्यानंतर हे संकेतस्थळ अज्ञात व्यक्ती किंवा समूहाने हॅक केल्याचे आढळून आले. त्यानंतर एनआयसीने संकेतस्थळ ब्लॉक केले असून पुढील तपास सुरू आहे. आता गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर 'This site can't be reached', असा संदेश दिसत आहे.

जानेवारीमध्ये नॅशनल सिक्‍युरिटी गार्डचे (एनएसजी) संकेतस्थळ हॅक झाले होते. हॅकर्सनी संकेतस्थळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतविरोधी मजकूर प्रसिद्ध केला होता. मागील आठवड्यात गृहमंत्रालयाने केंद्र आणि राज्य सरकारच्या संकेतस्थळ हॅकिंगबाबत लोकसभेत लेखी माहिती दिली होती. त्यानुसार गेल्या चार वर्षात केंद्र आणि राज्य सरकारची 700 पेक्षा अधिक संकेतस्थळे हॅक झाल्याचे सांगितले होते. तसेच हॅकिंगप्रकरणी गेल्या चार वर्षात 8 हजार 348 जणांना ताब्यात घेतले असल्याचीही माहिती दिली होती.