"मंत्रिजी, इसपर चढिये, तब लगेगा...,'

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 जून 2017

"मंत्रिजी, इसपर चढिये, तब लगेगा...,' असे स्थानिक भाजप नेते सुरेंद्रसिंग यांनी सांगितले. त्यनंतर मेघवाल हसले आणि शिडीवर चढून त्यांनी अधिकाऱ्याला फोन करून परिचारिकेची तात्पुरती नेमणूक करण्याची सूचना केली

बिकानेर - राजस्थानमधील श्रीडुंगरगड गावात रविवारी "डिजिटल इंडिया'चे उदासवाणे चित्र पाहावयास मिळाले. दुर्गम भागातील गावकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून स्थानिक आरोग्य केंद्रात परिचारिकेची व्यवस्था करण्याची मोबाईलवरून सूचना देण्यासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांना झाडाचा आधार घेऊन शिडीवर चढावे लागले.

मेघवाल हे राजस्थानच्या दौऱ्यावर असताना बिकानेरपासून 85 किलोमीटर अंतरावरील श्रीडुंगरगड या दुर्गम गावात मोटार थांबवली. तेथील नागरिकांना त्यांच्या समस्या विचारल्या त्या वेळी तेथील आरोग्य केंद्रामध्ये परिचारिकेची नेमणूक करण्याची सूचना मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकाऱ्यांना करण्याची विनंती केली. तेव्हा मंत्रिमहोदयांनी त्वरित त्यांच्या सहायकास संबंधित अधिकाऱ्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्यास सांगितले.

सहायकाकडून संपर्क साधला जात नसल्याचे पाहून एका नागरिकाने शिडी आणून तेथील झाडाला लावून उभी केली. "मंत्रिजी, इसपर चढिये, तब लगेगा...,' असे स्थानिक भाजप नेते सुरेंद्रसिंग यांनी सांगितले. त्यनंतर मेघवाल हसले आणि शिडीवर चढून त्यांनी अधिकाऱ्याला फोन करून परिचारिकेची तात्पुरती नेमणूक करण्याची सूचना केली.