लालूंच्या कन्येच्या सनदी लेखापालास अटक

पीटीआय
बुधवार, 24 मे 2017

याआधी या प्रकरणातील प्रमुख जैन बंधू असलेले वीरेंद्र आणि सुरेंद्र यांना ईडीने अटक केली आहे. हे जैन बंधू शेल अर्थात बनावट कंपन्यांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करत होते.

नवी दिल्ली : आठ हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणाशी संबंधित सनदी लेखापालास (सीए) सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. राजेश अगरवाल असे या सनदी लेखापालाचे नाव आहे. त्याला ईडी न्यायालयाच्या तीन दिवसांच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अगरवाल हा राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची कन्या मिसा भारता यांच्याकडे सीए म्हणूनही काम पाहत होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश रुबी अलका गुप्ता यांनी याबाबत आदेश दिले.

नवी दिल्लीस्थित दोन भावंडांचा मनी लॉंडरिंगच्या या रॅकेटमध्ये सहभाग आहे. अगरवाल हा हाय प्रोफाइल लोकांना त्यांचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी मदत करायचा. विशेष म्हणजे यामध्ये राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांचा सहभाग असलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या जमीन गैरव्यवहाराचाही समावेश आहे. या प्रकरणाचा तपास प्राप्तिकर विभागाकडे सोपविण्यात आला आहे. याआधी या प्रकरणातील प्रमुख जैन बंधू असलेले वीरेंद्र आणि सुरेंद्र यांना ईडीने अटक केली आहे. हे जैन बंधू शेल अर्थात बनावट कंपन्यांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करत होते. गेल्या तीन वर्षांपासून वेबसाइटच्या माध्यमातून 393 शेल अर्थात बनावट कंपन्यांनी देशातील 2900 कोटी रुपयांचा काळा पैसा पांढरा केल्याचे केंद्रीय गुन्हे अन्वेषणच्या (सीबीआय) तपासामध्ये समोर आले आहे. शेल कंपन्यांचा पैसा विशिष्ट कारणांसाठी, बनावट चलन व काळा पैसा तयार करण्यासाठी तसेच करचुकवेगिरीसाठी या पैशांचा वापर केला जातो.

देशभरातील 28 सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका, तसेच एका खासगी क्षेत्रातील बॅंकेमध्ये बनावट कर्जाची प्रकरणे समोर आली आहेत. शेल कंपन्यांच्या माध्यमातून ज्या देशामध्ये पैसा हस्तांतर केला, त्या देशांमधील कायदे काळ्या पैशाला बळकटी देणारे आहेत, त्यामुळे तपास कामामध्ये अडथळे येत आहेत.