गायींना वाचविणाऱ्या महिलांवर जमावाचा क्रूर हल्ला

वृत्तसंस्था
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

या भागातील 14 गायी अवैध कत्तलखान्याकडे नेल्या जात असल्याचे दिसून आल्यानंतर या महिलांनी पोलिस स्थानकामध्ये धाव घेतली. या महिला दोन हवालदारांना घेऊन घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांच्यावर तुफान दगडफेक करण्यात आली

बंगळूर - कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळूरपासून नजीक असलेल्या एका गावामध्ये गायींना अवैध कत्तलखान्यात नेण्यापासून वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिला व दोन पोलिस हवालदारांवर जमावाने हल्ला केला.

जखमी झालेल्या दोन्ही महिला या संगणक अभियंता आहेत. नंदिनी (वय 45) यांचा हात "फ्रॅक्‍चर' झाला असून त्यांच्या डोक्‍यासही दुखापत झाली आहे. सेजिल यांच्याही हात व चेहऱ्यास दुखापत झाली आहे. या महिलांबरोबर असलेल्या हवालदारांनी जमावास शांत करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर तुफान दगडफेक करण्यात आली. जमावाच्या हल्ल्यात या महिलांच्या गाडीचेही नुकसान झाले.

या भागातील 14 गायी अवैध कत्तलखान्याकडे नेल्या जात असल्याचे दिसून आल्यानंतर या महिलांनी पोलिस स्थानकामध्ये धाव घेतली. या महिला दोन हवालदारांना घेऊन घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांच्यावर तुफान दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी अद्याप कोणासही अटक करण्यात आलेली नाही. या घटनेतील 14 गायींना वाचविण्यात यश आले आहे.