गोहत्येच्या आरोपावरुन जमावाने मुस्लिम नागरिकाचे घर जाळले

वृत्तसंस्था
रविवार, 3 सप्टेंबर 2017

रेहमान मियां याने येथील स्थानिक मुस्लिम समुदायामध्ये वाटप करण्यासाठी सकाळीच त्याच्या घरी तीन गायी कापल्याचा आरोप असल्याची माहिती पोलिसांनी दिली. रेहमान याच्या घरी गोमांस व गायींची मस्तकेही आढळली आहेत. जमावाच्या हल्ल्याच्या भीतीने रेहमान हा फरार झाला आहे

रांची - झारखंड राज्यातील गिरिध जिल्ह्यामध्ये ईदच्या दिवशीच गोहत्या केल्याच्या आरोपावरुन संतप्त जमावाने मुस्लिम समुदायातील एका नागरिकाची तीन घरे जाळल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. या घटनेमुळे या भागामधील वातावरण अत्यंत तणावग्रस्त झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये, या उद्देशार्थ तातडीने जादाची सुरक्षा कुमकही धाडण्यात आली.

रेहमान मियां याने येथील स्थानिक मुस्लिम समुदायामध्ये वाटप करण्यासाठी सकाळीच त्याच्या घरी तीन गायी कापल्याचा आरोप असल्याची माहिती पोलिसांनी दिली. रेहमान याच्या घरी गोमांस व गायींची मस्तकेही आढळली आहेत. जमावाच्या हल्ल्याच्या भीतीने रेहमान हा फरार झाला आहे. "परिस्थिती नियंत्रणात असली; तरी खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे,' असे जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश वरियार यांनी सांगितले. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

ईदच्या काही दिवस आधीच भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील झारखंडमधील सरकारने विविध जाहिरातींच्या माध्यमामधून गोहत्या न करण्याचा इशारा दिला होता. गोहत्या केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते.

याआधी 27 जून रोजी, उस्मान अन्सारी (वय 55) यांच्या घराजवळ गायीचा सांगाडा आढळल्याने सुमारे हजार जणांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला चढवित त्यांचे घर जाळले होते. अन्सारी व त्यांच्या कुटूंबीयांना वाचविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला होता. ईदच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने यावेळी अन्न सुरक्षा व प्रमाणीकरण कायद्यांतर्गत उंटांची हत्या करण्यासही बंदी घातली होती. या भागात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे.