रेल्वेच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञान हवे

पीटीआय
शुक्रवार, 19 मे 2017

कोकण रेल्वेमध्ये केंद्रीय नियंत्रण प्रणाली असून, ती अन्य ठिकाणी बसवता येईल. रेल्वे संरक्षण दलासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे. तसेच लोहमार्गांना पोलिस संरक्षण देण्याबाबत सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला आहे

नवी दिल्ली - रेल्वे सुरक्षा भक्कम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासोबत गुप्तचर यंत्रणांमार्फत सुरक्षाविषयक माहिती जमा करण्यावर भर द्यायला हवा, असे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी केले.

रेल्वे सुरक्षेबाबत आयोजित परिषदेत बोलताना प्रभू म्हणाले, ""सुरक्षित प्रवासाचे उद्दिष्ट गाठण्यासमोरील आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. ही परिस्थिती केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आहेत. त्यामुळे सुरक्षेला सर्वाधिक महत्त्व देण्याची गरज आहे. सर्वच घटकांनी रेल्वे सुरक्षेसाठी सहभागी घ्यायला हवा. संकटे टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असून, गुप्तचर यंत्रणामार्फत समाजविरोधी घटकांच्या कारवायांची माहिती मिळविशे आवश्‍यक आहे. यात तंत्रज्ञानाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे.''

"कोकण रेल्वेमध्ये केंद्रीय नियंत्रण प्रणाली असून, ती अन्य ठिकाणी बसवता येईल. रेल्वे संरक्षण दलासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे. तसेच लोहमार्गांना पोलिस संरक्षण देण्याबाबत सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला आहे,'' असे प्रभू यांनी नमूद केले.

रेल्वे अपघातात मागील काही काळात वाढ झाली आहे. यामागे लोहमार्गांमध्ये अडथळे निर्माण करण्यासोबत अन्य प्रकारचे अपघात घडविण्याचे प्रयत्न होत असल्याचा संशय आहे. रेल्वेचे जाळे खुले असल्याने सुरक्षेला निर्माण होणारा धोकाही मोठा आहे.