निर्मला सीतारामन संरक्षणमंत्री; पीयूष गोयल रेल्वेमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

निर्मला सीतारामन यांच्याकडे देशाचे संरक्षण मंत्रालय येणे ही अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. 2014 पर्यंत भाजप प्रवक्‍त्या म्हणून उल्लेखनीय काम करणाऱ्या कणखर बाण्याच्या सीतारामन आता सरकारच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा मंत्रिमंडळ संरक्षण समितीच्या (सीसीपीए) सदस्य असतील. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना रेल्वेतून अपेक्षेप्रमाणे नारळ मिळाला असून, अरुण जेटलींकडील संरक्षण मंत्रालयाचा भार सीतारामन यांच्या बढतीने हलका झाला आहे.

नवी दिल्ली : भाजप प्रवक्‍त्या व केंद्रीय मंत्री म्हणून काम करणाऱ्या निर्मला सीतारामन यांच्याकडे संरक्षणमंत्रिपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतरच्या त्या दुसऱ्या महिला संरक्षणमंत्री ठरल्या आहेत. तसेच, पूर्णवेळ संरक्षणमंत्रिपद सांभाळणाऱ्या त्या पहिल्याच महिला असतील.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार 13 मंत्र्यांच्या शपथविधीने आज झाला. यात निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, मुख्तार अब्बास नक्वी, धर्मेंद्र प्रधान या राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती देण्यात आली आहे. तर अश्‍विनीकुमार चौबे, शिवप्रताप शुक्‍ला, चौधरी वीरेंद्रकुमार, हरदीपसिंग पुरी, अल्फॉन्स कन्नननाथन, अनंतकुमार हेगडे, राजकुमार उर्फ आर. के. सिंह, गजेंद्रसिंह शेखावत आणि सत्यपाल सिंह यांचा राज्यमंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. दरबार हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या सर्वांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळातील बहुतेक सर्व मंत्री या समारंभाला उपस्थित होते. उमा भारती या मात्र अनुपस्थित होत्या.

निर्मला सीतारामन यांच्याकडे देशाचे संरक्षण मंत्रालय येणे ही अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते. 2014 पर्यंत भाजप प्रवक्‍त्या म्हणून उल्लेखनीय काम करणाऱ्या कणखर बाण्याच्या सीतारामन आता सरकारच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा मंत्रिमंडळ संरक्षण समितीच्या (सीसीपीए) सदस्य असतील. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना रेल्वेतून अपेक्षेप्रमाणे नारळ मिळाला असून, अरुण जेटलींकडील संरक्षण मंत्रालयाचा भार सीतारामन यांच्या बढतीने हलका झाला आहे. आता ते अर्थमंत्री म्हणून आर्थिक वर्ष फेररचनेच्या मोदींच्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित करू शकतील. प्रभू यांची गच्छंती व जेटलींकडील संरक्षण मंत्रालयाचा भार कमी करणे याबाबत भाकीत करणारे वृत्त "सकाळ'ने यापूर्वीच दिले होते.

आज ज्या इतर तीन राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती मिळाली, त्यांत धर्मेंद्र प्रधान (पेट्रोलियम व नैसर्गिक वायू), मुख्तार अब्बास नक्वी (अल्पसंख्याक विकास) व पीयूष गोयल (रेल्वे) यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून निवडून आलेले गोयल यापूर्वी राज्यमंत्र्यांपेक्षा "सीईओ'च्या भूमिकेतच वावरत असल्याची चर्चा बाबूशाहीत होती. मात्र, ग्रामीण भारतात वीज पोचविणे व प्रधानमंत्री उज्ज्वला योजना यांच्या कथित यशामुळे त्यांची "बढती'ची प्रतीक्षा संपल्याचे मानले जाते.

स्वतंत्र भारताच्या सात दशकांच्या इतिहासात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर हे मंत्रालय सांभाळणाऱ्या 58 वर्षीय सीतारामन या दुसऱ्या महिला संरक्षणमंत्री ठरल्या आहेत. त्यातही पूर्णवेळ संरक्षणमंत्री असलेल्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. चीन व पाकिस्तानबरोबरची तणातणी वाढल्याच्या काळात त्यांच्याकडे हे पद देऊन मोदींनी आणखी एक धक्का दिल्याचे मानले जाते. भाजप प्रवक्‍त्या असताना इंग्रजीसह दाक्षिणात्य भाषांवरील प्रभुत्व सीतारामन यांच्या उपयोगी पडत असे. एकाच विषयावर त्या किमान पाच भाषांतून बोलत असत. त्यांना उद्योग भवनातून थेट रायसीना हिल्सवर मिळालेली बढती ही प्रचंड मोठी ठरली आहे. प्रकाशझोतात येण्याचे टाळून वाणिज्य व उद्योग खात्यात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या सीतारामन यांनी "मेक इन इंडिया' व "स्टार्ट अप इंडिया'चा डंका अगदी अलीकडच्या चीनमधील ब्रिक्‍स उद्योगमंत्री परिषदेपर्यंत देशविदेशांत वाजविला आहे. याबाबत विरोधकांच्या काही गैरमजुती आहेत; पण त्या लवकरच दूर होतील, असा टोला त्यांनी आनंद शर्मा यांना भर राज्यसभेत लगावला होता.

आंध्रातील ग्रामीण भागातून आलेल्या सीतारामन या दिल्लीच्या वादग्रस्त "जेएनयू'चेही प्रॉडक्‍ट मानल्या जातात. निवडणुकीच्या राजकारणापेक्षा त्या अरुण जेटली यांच्या "बुद्धिवादी' पंथाच्या व म्हणूनच जेटलींशी विशेष स्नेहभाव असलेल्या आहेत.

अर्थखात्याची सुप्त आस बाळगणारे गोयल यांना रेल्वे खाते मिळाले आहे. त्यांच्याप्रमाणेच भाजपमध्ये वडिलांचा वारसा चालविणारे धर्मेंद्र प्रधान यांना आहे त्याच पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयात बढती व राजीव रूडींकडील कौशल्य विकास मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार दिला गेला आहे. गोयल यांच्याकडील ऊर्जा खाते माजी गृहसचिव आर. के. सिंह यांच्याकडे व खाण खाते नरेंद्र तोमर यांच्याकडे आले आहे.

सुरेश प्रभू यांचे रेल्वे खाते मोदींनी अपेक्षेप्रमाणे बदलले आहे. रेल्वे भवनाच्या पाच मजल्यांवर ठाण मांडून बसलेली अजस्र बाबूशाही सुधारणा व पारदर्शकतेचा आग्रह धरणारा मंत्री कसा धुडकावते याचे हे उत्तम उदाहरण मानले जाते. रोडकरी असलेले नितीन गडकरी यांच्याकडे गंगा स्वच्छता हे खाते दिले आहे. गंगेची सफाई व गंगेतून जलवाहतूक सुरू करणे हा प्रचंड मोठा व अतिरिक्त व्याप गडकरींच्या खांद्यावर आला आहे.