पंतप्रधानांची दिवाळी जवानांसोबत

यूएनआय
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

माजी जवानांचा "वन रॅंक, वन पेन्शन' (ओआरओपी) या योजनेचा विषय गेल्या चाळीस वर्षांपासून लटकला होता. मात्र, मी माझे आश्‍वासन पाळले असून, "ओआरओपी'च्या अंमलबजावणीसाठी सुमारे 5500 कोटी रुपयांचा पहिला हप्ता दिला आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

शिमला - यंदाच्या दिवाळीत देशातील जवानांना शुभेच्छा संदेश पाठवा, असे आवाहन करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षीप्रमाणे यंदाही जवानांसोबतच दिवाळी साजरी केली. हिमाचल प्रदेशातील चीनच्या सीमेवर असलेल्या किन्नोर जिल्ह्यातील सुमदो येथील लष्करी तळावर मोदींनी इंडो-तिबेट सीमा पोलिसांची (आयटीबीपी) भेट घेतली.

त्यांनी कोणत्याही पूर्वसूचनेविनाच चांगो नावाच्या गावालाही भेट दिली आणि तेथील लोकांनी केलेले स्वागत आणि त्यांचा आनंद पाहून आपण भारावून गेल्याचे त्यांनी सांगितले.

हिरव्या रंगाचा पोशाख घातलेल्या पंतप्रधानांनी सुमदोमध्ये आयटीबीपीबरोबरच डोग्रा स्काउट्‌स आणि लष्कराच्या जवानांशीही चर्चा केली. जवानांबरोबरच त्यांनी नागरिकांमध्येही मिसळून गप्पा मारल्या. सुमदो हे राजधानी शिमलापासून 330 किलोमीटर अंतरावर आहे.
पंतप्रधान मोदी जवानांना मनमोकळेपणाने भेटले. त्यांनी जवानांना आग्रहाने स्वत:च्या हाताने मिठाई खाऊ घातली. मोदींनी या भेटीत औपचारिकता बाजूला ठेवल्याने जवानांनीही स्वत:च्या हातानं पंतप्रधानांचे तोंड गोड केले. पंतप्रधानांसमवेत या वेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि लष्करप्रमुख दलबीर सिंह सुहागही होते.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, पंतप्रधानांनी सीमा रस्ते संघटनेची शाखा जनरल रिझर्व्ह इंजिनिअरिंग फोर्सच्या जवानांशीही सुमदोमध्ये चर्चा केली. त्यानंतर मोदींनी किन्नौर जिल्ह्यातील चांगो गावातील लोकांशी गप्पा मारल्या.

पंतप्रधान अचानक आपल्या गावी आल्याचे पाहून सर्व गावकरी आश्‍चर्यचकित झाले आणि त्यांनी घोषणा देत त्यांचे स्वागत केले. मोदींनी गावकऱ्यांसोबत छायाचित्रेही काढली. मोदींनी पंतप्रधान बनल्यानंतर 2014 मध्ये पहिली दिवाळी सियाचिनमध्ये जवानांसोबत साजरी केली होती.

Web Title: Modi celebrates Diwali with Indian Military