मोदींच्या राजीनाम्याची मागणी हास्यास्पद- जदयू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची केलेली मागणी हास्यास्पद असून त्यांनी त्याबद्दल विनाअट माफी मागावी अशी मागणी संयुक्त जनता दलाने केली आहे.

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे खासदार भगवंत मान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची केलेली मागणी हास्यास्पद असून त्यांनी त्याबद्दल विनाअट माफी मागावी अशी मागणी संयुक्त जनता दलाने केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना संयुक्त जनता दलाचे नेते के सी त्यागी म्हणाले, "मान यांचा दृष्टिकोन हास्यास्पद आहे. त्यांनी विनाअट माफी मागावी. जर त्यांनी तसे केले नाही तर अध्यक्ष आणि इथिक्‍स समिती त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यास मोकळे आहेत.‘ मान यांनी संसद परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचे छायाचित्रण करून सोशल मिडियावर प्रसिद्ध केले होते. संवेदनशील स्थळाचे छायाचित्रण सार्वजनिक केल्याने त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका करण्यात येत आहे. त्याबद्दल मान यांनी लोकसभेत विनाअट दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र ती पुरेशी नसल्याचे म्हणत लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी मान यांनी सध्या लोकसभेपासून दूर राहावे असा सल्ला दिला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी नऊ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आले आहे. ही समिती 3 ऑगस्टपूर्वी यासंदर्भात अहवाल सादर करणार आहे. दरम्यान मान यांनी पठाणकोट येथील हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी पाकिस्तानमधील तपास संस्थांना परवानगी देऊन मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षेसोबत तडजोड केल्याचे म्हणत मान यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.