मोदी प्लॅस्टिक चलनाचे सेल्समन : ममता बॅनर्जी

वृत्तसंस्था
बुधवार, 11 जानेवारी 2017

मोदीबाबू आपण पूर्णपणे अहंकारी व्यक्ती आहात. "त्या' 120 नागरिकांच्या मृत्यूस तुम्ही सर्वस्वी जबाबदार आहात.
- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, प. बंगाल

कोलकाता : नोटाबंदीच्या निर्णयावरून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पुन्हा लक्ष्य केले. मोदी हे प्लॅस्टिकच्या चलनाचे सेल्समन असल्याचे विधान त्यांनी केले असून, जनता आता प्लॅस्टिक खाणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

नोटाबंदीनंतर देशभरातील बॅंकांसमोर लागलेल्या रांगांदरम्यान 120 नागरिकांचा मृत्यू झाला असून, त्यास मोदी सर्वस्वी कारणीभूत आहेत. असे ट्विटही ममता बॅनर्जी यांनी केले आहे. संबंधित मृतांची यादीही त्यासोबत प्रसिद्ध केली असून, त्यात मृत्यूची कारणेही नमूद आहेत. नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यापासून ममतांनी मोदी सरकारवर हल्ला चढविला असून, बॅंकेतून पैसे काढण्यावर असलेले निर्बंध मागे घ्यावेत, अशी मागणी ममता यांनी सोमवारी केली आहे.

काही दिवसांपूर्वी ममतांनी मोदींना कालिदास म्हणून हिणवले होते. मोदी कालिदासाप्रमाणे ज्या फांदीवर बसले आहेत. तीच फांदी तोडत असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. तसेच, त्यांनी नुकतीच राष्ट्रपतींची भेट घेत देशाच्या भविष्यासाठी मोदींना पदावरून हटविण्याचीही मागणी केली आहे.

दरम्यान, नोटाबंदी व पक्षातील मंत्र्यांना अटक झाल्याच्या कारणावरून तृणमूल कॉंग्रेसने विविध राज्यांत सुरू केलेली निदर्शने अद्याप सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मोदींचा तुघलकी कारभार
मोदींचा कारभार हा तुघलकी पद्धतीचा असून, त्यांच्या जे मनात येईल, तसे वर्तन करून ते देशाला खाईत लोटत आहेत. परिणामी, देशाच्या आर्थिक स्थितीस उतरती कळा लागली असून, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. सद्यःस्थिती ही 1975 च्या आणीबाणीपेक्षा भयंकर असून, त्यामुळे विकासदर घसरत असल्याचे ममता यांनी म्हटले आहे.