मोदीजी, माझेही आव्हान स्विकारा... - तेजस्वी यादव

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 मे 2018

तेजस्वी यादव यांनी मोदींवर टिका करत, 'बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे', शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे, दलित व अल्पसंख्यांकांवर हिंसाचार न होण्याचे आश्वासन देणे' ही आव्हाने स्विकारण्याची विनंती केली आहे.

पाटणा (बिहार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराट कोहलीचे फिटनेस चॅलेंज स्विकारल्यानंतर राष्ट्रीय जनता दल पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांनी मोदींवर टिका करत, 'बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे', शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे, दलित व अल्पसंख्यांकांवर हिंसाचार न होण्याचे आश्वासन देणे' ही आव्हाने स्विकारण्याची विनंती केली आहे.

फिटनेस चॅलेंज स्विकारण्याबाबत काही तक्रार नसून, देशातील इतरही अडचणींवर उपाय शोधण्याची विनंती तेजस्वी यांनी मोदींना ट्विटरद्वारे केली. काल (ता. 23) तेजस्वी यांनी पेट्रोल-डिझेल भाववाढीच्या निषेधार्थ फेसबुकवरूनही मोदींवर हल्ला केला होता. 'मोदींच्या प्रभावी नेतृत्वात पेट्रोल-डिझेलचे भाव हे शंभरी गाठणार' टोला त्यांनी लगावला. 

तंदुरूस्त भारतासाठी केंद्रीय मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी #HumFitTohIndiaFit या हॅशटॅगखाली एक मोहिम चालू केली आहे. यात आपला व्यायाम करतानाचा व्हिडीओ शेअर करायचा व पुढे इतर व्यक्तींना यासाठी आव्हान द्यायचे, अशी ही मोहिम आहे. त्यासाठी राठोड यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला आव्हान दिले होते. त्याने हे आव्हान स्विकारून पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हिडीओ शेअर करण्याचे आव्हान दिले व त्यांनी ट्विटरद्वारे हे आव्हान स्विकारल्याचे जाहिर केले आहे.    

 
 

Web Title: modi sir accept my challenge also said by tejaswi yadav