भारत खरेदी करणार इस्राईलकडून क्षेपणास्त्रे 

वृत्तसंस्था
बुधवार, 12 एप्रिल 2017

गेल्या आठवड्यात भारताने मध्यम आणि लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी इस्रायलशी 2 अब्ज डॉलरचा करार केला आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलैमध्ये इस्राईलच्या दौऱ्यावर जात असून, द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी भारत इस्राईलशी दोन संरक्षण करार करणार आहेत. यात रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे, नौदल हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे अशा 8 हजार क्षेपणास्त्रांच्या खरेदीचा समावेश आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या लष्करी हार्डवेअरचा भारत सर्वांत मोठा खरेदीदार देश आहे. दोन्ही देशांना बाह्य दहशतवादाचा धोका आहे. तसेच, अमेरिका आणि इस्राईलचे मैत्रीपूर्ण संबंध लक्षात घेता मोदी इस्रायलशी संबंध वाढविण्यावर भर देत आहेत. भारत इस्राईलकडून रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र 'स्पाइक' आणि नौदलासाठी हवाई संरक्षण क्षेपणास्त्र 'बराक-8'ची खरेदी करणार आहे. पुढील दोन महिन्यांत हे करार पूर्णत्वास जाण्याची शक्‍यता आहे. या दोन्ही करारांची किंमत सुमारे 1.5 अब्ज डॉलर असेल. हा करार झाल्यानंतर दोन वर्षांनी भारताला इस्राईलकडून 8 हजार क्षेपणास्त्र मिळतील. 

गेल्या आठवड्यात भारताने मध्यम आणि लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या खरेदीसाठी इस्रायलशी 2 अब्ज डॉलरचा करार केला आहे. पाकिस्तान आणि चीन या शेजारी देशांशी तणाव वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मोदी यांनी संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणासाठी 2025 पर्यंत 250 अब्ज डॉलर खर्च करण्याची योजना आखली आहे.