काँग्रेसने देशाला अनेक महापुरुष दिले : मोहन भागवत

Mohan Bhagwat
Mohan Bhagwat

नवी दिल्ली : "देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत कॉंग्रेसचे मोठे योगदान होते. त्यांनी देशाला अनेक महापुरुष दिले,'' असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज केले. 

संघाच्या वतीने "भविष्यातील भारत- रा. स्व. संघाचा दृष्टिकोन' या विषयावर भागवत यांच्या तीन दिवसीय व्याख्यानमालेला आज विज्ञान भवनात प्रारंभ झाला. ते म्हणाले, ""स्वातंत्र्यप्राप्तीसाठी देशाने जो संघर्ष केला. त्यामुळे देशाला अनेक नेते मिळाले. तिरंग्याचा व स्वातंत्र्याच्या सर्व प्रतीकांचा संघ सन्मान करतो व त्यांना पूर्ण समर्पित आहे. आपण देशासाठीच जगले पाहिजे. भारत हिंदू राष्ट्र होता, आहे आणि राहणार. हिंदुत्व समाजाला एकजूट ठेवते.'' 

"राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा चारित्र्यवान स्वयंसेवकांनी युक्त समाज घडवितो. आम्ही (संघ) सर्वलोकयुक्त भारतवाले लोक आहोत; मुक्तवाले आम्ही लोक नाही,'' अशा शब्दांत भागवत सत्तारूढ भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाचा समाचार घेतला. 

"संघाच्या वाढत्या शक्तीची अनेकांना भीती वाटते व त्यातून संघ हुकूमशाही पद्धतीने काम करतो यांसारखे अपप्रचार होतात,'' असे सांगून भागवत म्हणाले, ""उत्तम स्वयंसेवक म्हणजे चांगल्या चारित्र्याचा, समाजाचा विश्‍वास प्राप्त करणाऱ्या लोकांचा समूह देशभरात तयार व्हावा हीच संघाची संकल्पना आहे. संयम व त्याग ही संघाची दोन मूल्ये आहेत. या मूल्यांचे संवर्धन व जतन करणे हे संघकार्य आहे.'' संपूर्ण लोकशाही पद्धतीने व सामूहिक निर्णय करणारी सर्वांत लोकशाही संघटना म्हणजे संघ, असाही त्यांनी दावा केला. 

भारताच्या पतनाचा प्रारंभ हिंदू समाजाच्या पतनापासून झाल्याचे सांगून भागवत म्हणाले, ""संघाचा निर्वाह गुरुदक्षिणेवर चालतो. संघ बाहेरून पैसा घेत नाही व तसा आला तर तो परत करतो. निःस्वार्थपणे राष्ट्रसेवा, समाजसेवा केली तरी संघ स्वतःची पाठ कधी थोपटून घेत नाही. संघाचा रिमोट कंट्रोल असतो; पण तो फक्त शाखेपुरता. त्याबाहेर स्वयंसेवकांनी कोणते कार्यक्षेत्र निवडावे हे संघ ठरवीत नाही व त्यात हस्तक्षेपही करीत नाही.'' 

दिल्ली प्रांताचे संघचालक बजरंगीलाल, विहिंपचे अध्यक्ष आलोककुमार, भाजप संघटनमंत्री रामलाल, खासदार सुब्रमण्यम स्वामी, नरेंद्र जाधव, मीनाक्षी लेखी, अमरसिंह आदी तसेच उद्योगपती कुलभूषण आदी उपस्थित होते. 

संघाचा पंक्तीप्रपंच ! 
संघाच्या इतिहासात संघाबद्दल माहिती देणारी सरसंघचालकांची राजधानीतील ही पहिलीच व्याख्यानमाला आहे. त्यामुळे विज्ञान भवनाच्या परिसरात गर्दी झाली होती. मात्र प्रांतिक प्रसारमाध्यमांबाबत अनास्था व गोंधळाचे चित्र होते. पास संपल्याचे सांगून अनेकांना ताटकळत ठेवण्यात आले होते. महाराष्ट्रातील एक माजी उपप्राचार्य स्वयंसेवक दुपारी तीनपासून उन्हात ताटकळत थांबूनही त्यांना कार्यक्रम सुरू होईपर्यंत पास देण्यात आला नव्हता. मात्र त्याच व्यक्तीने संघाच्या कोण्या पदाधिकाऱ्याशी संपर्क केला की, तत्काळ पास मिळत होते. पास संपले असे सांगून अनेक देशी-विदेशी पत्रकारांनाही मज्जाव करण्यात आला हे दृश्‍य एकीकडे, तर पासांचे गठ्ठेच्या गठ्ठे घेऊन फिरणारे स्वयंसेवक दुसरीकडे, असे विरोधाभासी चित्र दिसत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com