मॉन्सून 30 मेपर्यंत केरळमध्ये: हवामान विभाग

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 मे 2017

मॉन्सून रविवारी भारताच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच अंदमान-निकोबारमध्ये दाखल झाला असून, आता त्याने पूर्ण अंदमान व्यापला आहे. मॉन्सूनच्या प्रगतीस अनुकुल वातावरण असून, तो 30 पर्यंत केरळच्या किनारपट्टीवर धडकेल.

नवी दिल्ली - देशभरातील शेतकऱ्यांच्या नजरा लागून राहिलेले नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) 30 मेपर्यंत म्हणजे नियोजित वेळेच्या दोन दिवसआधीच केरळच्या किनारपट्टीवर येणार असल्याचे हवामान विभागाकडून (आयएमडी) स्पष्ट करण्यात आले आहे. 

मॉन्सून रविवारी भारताच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच अंदमान-निकोबारमध्ये दाखल झाला असून, आता त्याने पूर्ण अंदमान व्यापला आहे. मॉन्सूनच्या प्रगतीस अनुकुल वातावरण असून, तो 30 पर्यंत केरळच्या किनारपट्टीवर धडकेल. नियोजित वेळेनुसार मॉन्सून 1 जूनला केरळच्या किनारपट्टीवर येतो. मात्र, दोन दिवसआधीच तो केरळमध्ये दाखल होणार आहे.

यावर्षी साधारणपणे सरासरी 96 टक्के पाऊस होईल, असा अंदाज आहे. देशात नेमका किती पाऊस होईल, हे चित्र जूनच्या पहिल्या आठवड्यात अधिक स्पष्ट होईल, असे हवामानशास्त्र विभागाचे म्हणणे आहे. बंगालच्या उपसागराचा दक्षिण पूर्वभाग, अंदमान-निकोबार बेटांवर जोरदार पाऊसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सर्वसाधारणपणे 20 मे रोजी मॉन्सून अंदमानात दाखल होतो. त्यानंतर पुढील दहा दिवसांत म्हणजेच एक जूनपर्यंत तो श्रीलंका व्यापून केरळात प्रवेश करतो. पण, यंदा तो लवकर दाखल होणार आहे.

Web Title: Monsoon rains to arrive on southern Kerala coast on May 30: IMD source