बहुतांश कर्मचारी पगाराबाबत असमाधानी: सर्व्हे

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 एप्रिल 2017

'तरुणांना समोर ठेवून, त्यांच्या मानसिकतेचा विचार करून, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे कंपन्या वेतनश्रेणींमध्ये आवश्‍यक ते बदल करत आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांना अन्य काही लाभ देऊन आकर्षित करत आहेत'

नवी दिल्ली - बहुतांश कर्मचारी आपल्या पगाराबाबत असमाधानी असल्याचे नुकतेच एका सर्व्हेतून समोर आले आहे. सर्व्हेत सहभागी झालेल्या एकूण 70 टक्के कर्मचाऱ्यांनी त्यांचे वेतन हे बाजारातील मानकांप्रमाणे नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, माहिती तंत्रज्ञानासंदर्भातील सेवा, व्यापार, शिक्षण, माध्यम आणि मनोरंजन, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि अन्य काही क्षेत्रात काम करणारे कर्मचारी या सर्व्हेमध्ये सहभागी झाले होते. "विस्डमजॉब्स.कॉम'ने घेतलेल्या या सर्व्हेमध्ये हैदराबाद, मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळूर आणि पुण्यातील कर्मचाऱ्यांनी सहभाग करून घेण्यात आले होते. बहुतांश कर्मचारी आपल्या वेतनाबाबत असमाधानी आहेत. तर वेतनाशिवाय मिळणारे अन्य लाभ तेवढेच महत्त्वाचे असल्याचे कर्मचाऱ्यांना वाटते.

'तरुणांना समोर ठेवून, त्यांच्या मानसिकतेचा विचार करून, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे कंपन्या वेतनश्रेणींमध्ये आवश्‍यक ते बदल करत आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांना अन्य काही लाभ देऊन आकर्षित करत आहेत', अशा प्रतिक्रिया "विस्डमजॉब्स.कॉम'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कोल्ला यांनी व्यक्त केल्या आहेत.

या सर्व्हेतील काही प्रमुख निष्कर्ष

  • निश्‍चित आणि पूरक वेतन हा प्रमुख मुद्दा असल्याच्या मत 53 टक्के कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
  • 70 टक्के कर्मचाऱ्यांना असे वाटते की त्यांना बाजारातील मानांकाप्रमाणे वेतन मिळत नाही.
  • पार पाडत असलेल्या जबाबदारीएवढे वेतन मिळत नसल्याचे 30 टक्के कर्मचाऱ्यांना वाटते.
  • सर्व्हेत सहभागी बहुतेक कर्मचाऱ्यांनी "वर्क-फ्रॉम-होम'साठी पसंती दिली आहे.
  • उच्च वेतनाप्रमाणे त्यासोबत मिळणारे लाभही तेवढेच महत्त्वाचे आहेत, असे 60 टक्के महिला कर्मचाऱ्यांना वाटते. तर हे प्रमाण पुरुष कर्मचाऱ्यांमध्ये केवळ 30 टक्के आहे.