अवघ्या 200 रुपयात आईने पोटच्या पोराला विकले!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 मे 2017

एका आदिवासी महिलेने तिच्या पोटच्या पोराला अवघ्या दोनशे रुपयांत विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत संबंधित महिलेच्या पतीनेच माहिती दिली आहे.

गंदचारा (त्रिुपरा) : एका आदिवासी महिलेने तिच्या पोटच्या पोराला अवघ्या दोनशे रुपयांत विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत संबंधित महिलेच्या पतीनेच माहिती दिली आहे.

दारिद्य्र रेषेखालील संवर्गात असलेल्या आदिवासी महिलेने 13 एप्रिल रोजी तिच्या मुलाला ढलाई जिल्ह्यातील लक्ष्मीपूर गावातील एका रिक्षाचालकाला विकले. याबाबत विकलेल्या मुलाचे पिता खानाजॉय रियांग यांनी माहिती दिली. "मी मुलाला विकू नको असे सांगितले. मात्र तिने दोनशे रुपयात मुलाला विकले. सध्या आमचा मुलगा मचकुंभी गावात आहे. हे प्रकरण गावातील प्रमुखाकडे पोहोचले. त्यांनी मुलगा परत मिळवून दिला जाईल असे सांगितले. ज्याने मुलगा विकत घेतला आहे त्याला आम्ही भेटलो. तर त्याने फक्त आईलाच मुलगा परत देईल, असे सांगितले', अशी माहिती रियांग यांनी दिली.

दरम्यान समाज कल्याण आणि समाज शिक्षण विभागाने मुलाला परत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे. "आम्हाला या प्रकाराबाबत माहिती आहे. आम्ही "चाईल्ड लाईन'च्या माध्यमातून मुलाला त्याच्या जन्मदात्या आईकडे परत पाठविण्याचा प्रयत्न करत आहोत', अशी माहिती स्थानिक बालविकास अधिकारी अबिद हौसेन यांनी दिली. मागील पंधरा दिवसात मुलाला विकण्याचा हा दुसरा प्रकार समोर आला आहे. गेल्या दोन वर्षांत त्रिपुरातील आदिवासी कुटुंबांनी त्यांच्या अपत्यांना विकण्याचे किमान चार घटना घडल्या आहेत.