गोव्यात काँग्रेसचा टांग्यातून प्रवास; इंधन दरवाढीविरोधात आंदोलन

अवित बगळे
गुरुवार, 24 मे 2018

मोदी सरकार हाय हाय, पेट्रोल आम्हाला स्वस्त हवे अशा घोषणा देत काँग्रेस हाऊसकडून टांग्यातून प्रवास फेरी सुरु झाली.

पणजी - गोव्यात काँग्रेसने इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेस हाऊस ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी टांग्यातून फेरी काढली. या टांग्याचे सारथ्य विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर व प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केले. टांग्यात आमदार आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स आणि महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अॅड. प्रतिमा कुतिन्हो होत्या.

मोदी सरकार हाय हाय, पेट्रोल आम्हाला स्वस्त हवे अशी घोषणा देत काँग्रेस हाऊसकडून ही फेरी सुरु झाली. जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन नेत्यांनी दरवाढ कमी करण्याची मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चोडणकर म्हणाले, इंधन दराचा उच्चांक करण्याचा विक्रम भाजप आघाडी सरकारने केला आहे. चार वर्षात सरकारने 10 लाख कोटी रुपये कराच्या रुपाने जनतेकडून घेतले तरी इंधनाचे दर नियंत्रणात का ठेवले जात नाहीत. गेल्या चार वर्षात पेट्रोलियम पदार्थांवरील उत्पादन शुल्क 211 टक्क्यांनी वाढवले आहे. डिझेलवर 443 टक्के उत्पादन शुल्क आहे. कच्च्या तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात उतरत असताना देशातील इंधनाचे दर उतरत नव्हते मग आता ते दर चढत असताना येथील दर का वाढवले जातात. काँग्रेसने जनतेला घोडागाडीवरून कारगाडीत आणले भाजपने कारगाडीतून जनतेला घोडागाडी, सायकलवर ढकलले आहे.

विरोधीपक्षनेते कवळेकर म्हणाले, काँग्रेसवर टीका करताना भाजप नेहमीच प्रसिद्धीसाठी हे सारे केले जाते, असा आरोप करते. आता इंधन दरवाढ झालेली नाही, केवळ प्रसिद्धीसाठी हे आंदोलन आम्ही केले असा आरोप भाजपने करून दाखवावा. गेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी पेट्रोलचा दर 65 रुपयांवर जाणार नाही अशी हमी दिली होती. दर वाढले तर मूल्यवर्धित कर कमी करण्याचे आश्वासन दिले होेते. मुख्यमंत्री आजारी असल्याने विदेशात आहेत. मात्र येथे त्यांच्या वतीने कामकाज पाहणाऱ्या समितीने तातडीने बैठक घेऊन हे आश्वासन पाळण्याची वेळ आली आहे.

आमदार कामत म्हणाले, मनमोहनसिंग यांचे सरकार असताना 118 डॉलरवर बॅरलचा दर गेला असतानाही दरवाढ होऊ दिली नव्हती. आता 70 डॉलर दर असताना इंधन दरवाढ का केली जाते. आसामातील जनता भूतानमधून स्वस्त इंधन आणतात, मग भारतात स्वस्त इंधन का मिळू शकत नाही. पेट्रोलियम पदार्थ वस्तू सेवा कायद्यांतर्गत समाविष्ट केल्यास दर कमी होतील. यावेळी युवक काँग्रेस आणि महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Movement against fuel price hike in goa by congress