अखिलेशच पुढील मुख्यमंत्री - मुलायमसिंह

वृत्तसंस्था
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

आमच्या कुटुंबातही वाद नाहीत. अखिलेशच पुढील मुख्यमंत्री होईल. त्याच्याशिवाय दुसरा कोण मुख्यमंत्री होणार?

लखनौ - यादव कुटुंबात कोणताही वाद नसून, अखिलेश यादवच उत्तर प्रदेशचा पुढील मुख्यमंत्री असेल, असा विश्वास समाजवादी पक्षाचे (सप) प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी व्यक्त केला.

अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मुलायमसिंह यादव यांनी नाराजी दर्शविली होती. तसेच त्यांनी सायकल या चिन्हासाठी निवडणूक आयोगापर्यंत धाव घेतली होती. अखेर अखिलेश यादव यांनी सायकल हे चिन्ह मिळाले होते. मुलायमसिंह आणि शिवपाल यादव यांची नाराजी कायम होती. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाने काँग्रेसबरोबर आघाडी केल्यानंतर प्रथमच मुलायमसिंह यांनी मत व्यक्त केले आहे.

मुलायमसिंह म्हणाले, की शिवपाल यादव आणि अमरसिंह हे नाराज नाहीत. सध्या पक्षात कोणीही नारज नाही. या नेत्यांचा नाराज होण्याचा प्रश्नच नाही. आमच्या कुटुंबातही वाद नाहीत. अखिलेशच पुढील मुख्यमंत्री होईल. त्याच्याशिवाय दुसरा कोण मुख्यमंत्री होणार? मंगळवारपासून मी सप आणि काँग्रेस आघाडीचा प्रचार सुरु करणार आहे.