पाकिस्तानच्या चौदा चौक्‍या उद्‌ध्वस्त

वृत्तसंस्था
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016

 उरीतील दहशतवादी हल्ल्यात भारताचे 19 जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर आक्रमक भूमिका घेत भारताने 'सर्जिकल स्ट्राईक'द्वारे पाकिस्तानचा अंमल असलेल्या भागातील दहशतवादी तळ उध्वस्त केले होते. या कारवाईमुळे हादरलेल्या पाकिस्तानी सैन्याने त्यानंतर सतत शस्त्रसंधीचा भंग करत भारतील चौक्‍यांवर गोळीबार केला आहे.

श्रीनगर/ नवी दिल्ली - पाकिस्तानच्या सीमेवरील कुरापती पुन्हा वाढल्या असून, आज पाकच्या लष्कराने भारतीय हद्दीमध्ये तोफगोळे डागत आठ निष्पाप नागरिकांचा जीव घेतल्यानंतर भारतानेही याला चोख प्रत्युत्तर दिले. सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानच्या चौक्‍यांना शक्तिशाली शस्त्रांच्या माध्यमातून लक्ष्य करत चौदा चौक्‍या उद्‌ध्वस्त केल्या आहेत.

जम्मूमधील रामगड आणि अर्निया सेक्‍टरमधून भारतीय लष्कराने ही कारवाई केली. तत्पूर्वी पाकच्या लष्कराने केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात आठ नागरिक ठार झाले असून, अन्य 22 जण जखमी झाले आहेत. सांबा, जम्मू, पूँछ आणि राजौरी जिल्ह्यामध्ये पाकच्या लष्कराने तोफगोळे डागल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या तोफगोळ्यांचा आकार 82 ते 120 मिलिमीटर एवढा असल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्‍टरमध्ये भारतीय जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पाकचे दोन सैनिक ठार झाल्याचेही समजते. सांबा जिल्ह्यातील रामगड सेक्‍टरमध्ये पाकिस्तानने तोफगोळे डागल्याने पाच नागरिक ठार झाले असून, अन्य नऊ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती सांबाच्या उपायुक्त शीतल नंदा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. पाकच्या तोफगोळ्यांचा मोठा फटका रामगड सेक्‍टरमधील जर्दा आणि रंगूर छावणीतील खेड्यांना बसला आहे. नौशेरा सेक्‍टरमध्ये लष्कराचे तीन हमाल या तोफगोळ्यांच्या माऱ्यात जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, सोमवारीही जम्मू-काश्‍मीरमध्ये मेंढरच्या बालाकोट आणि मनकोट भागामध्ये पाकिस्तानच्या लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन भारतीय चौक्‍यांच्या दिशेने गोळीबार केला होता. या वेळी तोफगोळ्यांचाही मारा करण्यात आला.

सर्जिकल स्ट्राइकचा बदला
पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून, यामध्ये आतापर्यंत अठरा जणांचे प्राण गेले असून, 80 जण जखमी झाले आहेत. यातील बारा जण हे स्थानिक नागरिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारताच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानकडून 63 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले असून, या हल्ल्यामुळे सीमावर्ती भागातील घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सर्जिकल स्ट्राइकचा बदला घेण्यासाठी पाक वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करतो आहे.

शस्त्रसंधी उल्लंघन
सकाळी सहापासून सांबा आणि जम्मूत गोळीबार
अर्निया सेक्‍टरमध्ये चार-पाच ठिकाणी गोळीबार
रामगढ सेक्‍टरमध्ये तरुणीसह दोन मुले ठार; चौघे जखमी
राजौरीमध्ये दोन, लंगूरमध्ये गोळीबारात एक जण ठार