बुलेट ट्रेनचे तिकीट 250 रुपयांपासून 

बुलेट ट्रेनचे तिकीट 250 रुपयांपासून 

मुंबई-अहमदाबाद मार्गावर 2022 पासून धावणार 

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असलेल्या प्रस्तावित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे तिकीट दर प्रत्येकी 250 ते तीन हजार रुपये इतके असतील, असे रेल्वेतर्फे आज सांगण्यात आले. ताशी किमान 320 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या या ट्रेनचे काम याचवर्षी डिसेंबरमध्ये सुरू होईल. 2022 पर्यंत ही महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रत्यक्ष सुरूही करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रयत्नशील आहे, असे राष्ट्रीय गतिमान रेल्वे महामंडळ लिमिटेडच्या (एनएचएसआरसीए) मुख्य संचालिका अचल खरे यांनी आज पत्रकारांना सांगितले. 

बुलेट ट्रेनचे जे प्रारंभिक तिकीटदर रेल्वेने निश्‍चित केले त्याचप्रमाणे ते आकारले गेले, तर सध्या या मार्गावरील दुरान्तो गाडीसाठी लागणाऱ्या कमाल तिकीट दरापेक्षा ते जेमतेम एक हजार रुपयांनी वाढीव असतील. खरे यांनी सांगितले, की बुलेट ट्रेनने प्रवास करणाऱ्या सामन्य प्रवाशांना चढ्या तिकिटदरांची बिलकूल झळ बसू नये, असे आमचे प्रयत्न आहेत. मात्र बिझनेस क्‍लासच्या प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागतील. सध्या निश्‍चित केलेले तिकीटदर वर्तमान काळातील रेल्वे दर व आर्थिक गणित लक्षात घेऊन जाहीर केल्याचेही त्यांनी सूचित केले. मुंबई-अहमदाबाद या संपूर्ण प्रवासात बिझनेस क्‍लासचे तिकीटदर तीन हजार रुपये असतील. बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्‍स ते ठाणे या टप्प्यासाठी 250 रुपयांचे तिकीट काढावे लागेल. वातानुकूलित प्रथम श्रेणीचे तिकीटदर दीडपट असतील. 

"एनएचएसआरसीए'च्या वतीने यंदा डिसेंबरपर्यंत बुलेट ट्रेनसाठी जमीन संपादनाचे काम पूर्ण होईल, असा विश्‍वास व्यक्त करून खरे म्हणाल्या, की या वर्षअखेर बुलेट ट्रेनचे काम सुरू होईल. महाराष्ट्र सरकारने जमीन संपादनासाठी अधिसूचना जारी केली आहे. 

बुलेट ट्रेनमुळे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. तीन ते चार हजार लोकांना प्रत्यक्ष नोकऱ्या मिळतील. संपूर्ण प्रकल्पाच्या कामात किमान 30 ते 40 हजार कामगारांना रोजगार मिळतील. जमिनीवरील म्हणजेच 460 किलोमीटरच्या पट्ट्यातील कामे भारतीय तंत्रज्ञ व ठेकेदार करतील. जपान फक्त समुद्राच्या खालून जाणाऱ्या 21 किलोमीटर पट्ट्याचे काम पूर्णत्वास नेईल. सुरक्षितता व कालमर्यादेत काम पूर्ण करण्यास सर्वोच्च प्राधान्य राहील, असेही खरे यांनी सांगितले. 

वेगाच्या मार्गावर : 320 किलोमीटर गाडीचा ताशी वेग 

                          1415 हेक्‍टर जमीन संपादन आवश्‍यक 

                          10 हजार कोटी रुपये केलेली तरतूद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com