मुंबई साखळी बॉम्बस्फोट: सालेम, डोसा दोषी; शिक्षा आता सोमवारी?

93 blasts
93 blasts

मुंबई - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात 1993 मध्ये साखळी बॉंबस्फोट घडविल्यासंदर्भातील "खटला ब'ची सुनावणी करणाऱ्या विशेष टाडा न्यायालयाने आज (शुक्रवार) गॅंगस्टर अबु सालेम याच्यासह मुस्तफा डोसा, करीमुल्ला, रियाज सिद्दीकी, फिरोज खान व ताहीर मर्चंट हे आरोपी दोषी असल्याचा स्पष्ट निकाल दिला. याचबरोबर, न्यायालयाने कय्यूम शेख याला निर्दोष मुक्त केले.

दोषी आरोपींपैकी रियाझ सिद्दीकी हा टाडा अंतर्गत दोषी आढळला; तर हत्या आणि कट रचल्याप्रकरणी त्याला दोषमुक्त ठरविण्यात आले. दरम्यान, न्यायालयाची आजची सुनावणी संपली असून आता येत्या सोमवारी शिक्षेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील पहिले प्रकरण ए चा निकाल यापूर्वी लागला असून त्यातील मुख्य आरोपी याकुब मेमन याला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जुलै 2015 मध्ये फाशी देण्यात आली. सध्या सुरू असलेल्या खटल्यातील सात आरोपी मूळ खटला सुरू झाल्यानंतर पोलिसांच्या हाती लागल्याने न्यायालयाने आधी 100 आरोपींवरील खटला पूर्ण केला. त्यानंतर या सात जणांवर खटला चालवला. मुंबई बॉम्बस्फोटाची केस बी म्हणून सात जणांवरील खटला चालवण्यात येत आहे.

अबू सालेमला पोर्तुगालमधून प्रत्यार्पित करण्यात आले; तर मुस्तफा डोसाला यूएईमधून अटक करण्यात आले. मात्र पोलिसांनी अटक केली नसून तपास यंत्रणेपुढे शरणागती पत्करल्याचा दावा मुस्तफा डोसा याने केला आहे. या हल्ल्याचा सूत्रधार दाऊद इब्राहिम, मोहम्मद डोसा आणि टायगर मेमन हे फरारी आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.

दरम्यान, अभिनेता आणि 93 च्या खटल्यातील आरोपी संजय दत्त याला शस्त्र पुरवल्याचा आरोप अबू सालेमवर आहे; तर संजय दत्तच्या घरी शस्त्रास्त्रे पोहोचवल्याचा आरोप कय्युमवर आहे. याच प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या मुस्तफा डोसावर बॉम्बस्फोट करण्यासाठीचा कट रचल्याचा व त्यासाठी नियोजित स्थळी शस्त्रास्त्रे उतरवल्याचा आरोप आहे; तर ताहीरवर या प्रकरणातील अन्य आरोपींची पाकिस्तानमध्ये जाण्याची सोय केल्याचा आरोप आहे.

12 मार्च 1993 मध्ये झालेल्या या बॉंबस्फोटांमुळे मुंबईमधील जनजीवन अक्षरश: ढवळून निघाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com