हिंदू मुलीसोबत प्रेम संबंधांमुळे मुस्लिम तरुणाची हत्या

वृत्तसंस्था
शनिवार, 8 एप्रिल 2017

बुधवारी राम नवमीच्या दिवशी ही मुलगी त्याला भेटण्यासाठी गुमला गावात आली होती. पण, त्याने भेटण्यास नकार दिला होता. अखेर तो तिला भेटला आणि तिला सोडण्यासाठी तिच्या गावात गेल्यानंतर गावकऱ्यांनी त्याला पकडले. त्यानंतर त्याला झाडाला बांधून बराच वेळ मारहाण केली.

गुमला - झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील एका गावात हिंदू मुलीसोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून एका 20 वर्षीय मुस्लिम तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या युवकाला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली.

गुमला येथील रझा कॉलनीमध्ये राहत असलेल्या मोहम्मद शालिक (वय 20) या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. सोसो या शेजारील गावातील एका हिंदू मुलीसोबत त्याचे गेल्या वर्षापासून प्रेमसंबंध होते. बुधवारी राम नवमीच्या दिवशी ही मुलगी त्याला भेटण्यासाठी गुमला गावात आली होती. पण, त्याने भेटण्यास नकार दिला होता. अखेर तो तिला भेटला आणि तिला सोडण्यासाठी तिच्या गावात गेल्यानंतर गावकऱ्यांनी त्याला पकडले. त्यानंतर त्याला झाडाला बांधून बराच वेळ मारहाण केली. या मारहाणीत त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मुलीने तक्रार दाखल केली आहे. या हत्येप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. तपास सुरु असून, काही गावकऱ्यांनी हा तरुण प्रथमच गावात आल्याचे म्हटले आहे. 

उत्तर प्रदेशप्रमाणे झारखंड सरकारनेही अँटी रोमिओ स्कॉडची निर्मिती केली आहे. तसेच अवैध कत्तलखान्यांवरही बंदी घातली आहे. यामुळे अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचे बोलले जात आहे.